
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. मात्र, शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून येऊन गँग ऑफ गद्दारमध्ये सामील झालेले पळपुटे सहा आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉँग्रेसमधील फुटिरांचे काय? याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निर्णय घेतलेला नाही. यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त तूर्त लांबणीवर पडला असून मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले आणखी महिनाभर गॅसवर राहणार आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा होती. पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात करण्यात आलेली खासदारांची फोडाफोडी तसेच पंजाबमधील आपच्या राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश लक्षात घेता फुटीर खासदारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याचवेळी समाधानकारक कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. फुटीर खासदारांची मंत्रिपदी नियुक्ती कशी करायची हा प्रश्न मोदी सरकारपुढे आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधान कार्यक्रमांत व्यस्त
मंत्रिमंडळ विस्तारासाठी राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती आवश्यक आहे. मात्र हे दोघेही नजीकच्या काळात कार्यक्रमांत व्यस्त आहेत. राष्ट्रपती मुर्मू या दोन दिवसांच्या आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यानंतर जपानचे पंतप्रधान भारत भेटीवर येणार आहेत. तर पंतप्रधान मोदी 6 ते 11 जुलै विदेश दौऱ्यावर आहेत. या कालावधीत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमी आहे. साधारण 20 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची चिन्हे असून अधिवेशन संपल्यावरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा आहे.
फुटीरांबाबत कायदेशीर सल्लामसलत
शिवसेना, तृणमूल कॉँग्रेसमधील फुटीर खासदारांबाबत लोकसभा अध्यक्ष घटनातज्ञ तसेच कायदे तज्ञांशी सल्लामसलत करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तृणमूल कॉँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या बंडखोर खासदारांनी दुसऱ्या पक्षात आपला गट विलीन केला आहे. जरी ते दुसऱ्या पक्षात सामील झाले असले तरी त्यांच्यावर अद्यापही अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.
शिवसेनेतून फुटलेल्या सहा खासदारांनी पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करत दाद मागितली आहे.



























































