
महाराष्ट्र सरकारने माहिती अधिकार कायद्याच्या नियमांत केलेले बदल तत्काळ मागे घ्यावेत; अन्यथा येत्या 5 जुलैपासून राळेगणसिद्धी येथे आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या स्मरणपत्राद्वारे दिला आहे.
अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘मी 22 जून 2026 रोजी पत्र पाठवून महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम-2026 ‘फ’मधील अनेक तरतुदी नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणाऱया असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच शासनाने या नियमांचा पुनर्विचार न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता.
राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, आयुक्त मकरंद रानडे आणि आयुक्त प्रकाश इंदलकर यांनी राळेगणसिद्धी येथे माझ्याशी सविस्तर चर्चा केली. मात्र, आम्ही आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवू, पुढील निर्णय शासनच घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर शासनाने 12 जून 2026 रोजी नवीन नियमावली अधिसूचित केली आहे.
नवीन नियमांच्या आडून हा कायदाच मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची जनभावना आहे. या कायद्यासाठी मी अनेक वर्षे वेगवेगळ्या सरकारांविरुद्ध लढा दिला आहे. त्यामुळे कायद्याची गळचेपी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही,’ असा इशारा हजारे यांनी सरकारला दिला आहे.




























































