
जून महिना संपला तरी अद्यापि समाधानकारक पाऊस झालेला नाही. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. पावसाअभावी शेतीची कामे खोळंबली असून, खरीप हंगामाचे नियोजनही अनिश्चिततेत सापडले आहे. ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे उद्भवलेल्या या दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने व्यापक कृती आराखडा तयार केला असून, शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेता यावे, पावसाच्या परिस्थितीनुसार कमी पाण्यावर येणारी पर्यायी पिके घेता यावीत, एका पिकाऐवजी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला जावा, यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. तसेच १०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झालेल्या भागात पेरणीची घाई करू नये, असे आवाहन केले जात आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि कृषिविकास अधिकारी अजित पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पाणीटंचाईसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. ज्या गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे, तेथे पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव द्यावेत, आवश्यक ठिकाणी विंधन विहीर खोदण्यासाठी लवकरात लवकर मशीन उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना करण्यात आल्या.
‘एल-निनो’च्या पाश्र्वभूमीवर निर्माण होणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हानिहाय आकस्मिक पीक आराखडा तयार करून पर्यायी पिकांचे नियोजन करणे, अल्पकालीन व दुष्काळ सहनशील वाणांच्या बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून त्याचे वेळेवर वितरण करणे, शेततळे, बांधबंदिस्ती, जलसंधारण, ठिबक व तुषार सिंचनाला प्रोत्साहन, बाजरी, ज्वारी, तूर, मूग, उडीद यांसारख्या कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांवर भर, मिश्रपिके व आंतरपीक पद्धतीचा अवलंब, पुनर्पेरणीसाठी पर्यायी पिकांची तयारी, जनावरांसाठी चारा पिकांची लागवड, मुरघास, वाळलेला चारा, पाणी उपलब्ध करून देणे, पीक व पाण्याचे सतत निरीक्षण करून तातडीने उपाययोजना राबवणे, पीकविमा आणि शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे, बियाणी, खते व औषधांचा साठ उपलब्ध ठेवणे व टंचाईकाळात तो शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे यांसारख्या उपाययोजना राबवण्यावर भर द्यावा, अशा सूचना आढावा बैठकीत देण्यात आल्या.





























































