
शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांविरुद्ध शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष असून त्याचे पडसाद आज नांदेडमध्ये उमटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना माहुर येथे शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवले आणि गद्दारांविरुद्ध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दरम्यान, पोलिसांनी दडपशाही करत शिवसैनिकांची धरपकड केली तर शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांना शिंदे येण्याअगोदरच अंजनखेड गावातून ताब्यात घेतले.
माहुर तालुक्यातील सारखणी येथे श्रीकांत शिंदे येणार होते. त्यांच्यासोबत गद्दार खासदार नागेश पाटील-आष्टीकर होते. त्यांना विरोध होणार हे लक्षात आल्याने पोलिसांनी नांदेड विमानतळापासून सारखणीपर्यंत जागोजागी बंदोबस्त लावला होता. शिंदे यांच्या गाडय़ा नांदेड विमानतळावरून निघाल्या आणि माहूरच्या वेशीवर येताच शिवसैनिक गनिमी काव्याने काळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले. पोलिसांनी धरपकड सुरू केली, मात्र त्याला शिवसैनिकांनी जुमानले नाही. ‘नीम का पत्ता कडवा है, नागेश पाटील xxx है’, गद्दारांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय’ अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला. शिवसैनिकांच्या कचाटय़ातून पोलिसांनी कश्याबश्या शिंदेंच्या गाडय़ा पुढे काढल्या. शिवसेनेचे तालुकाप्रमुख जितू चोले, शहरप्रमुख बालाजी वाघमारे, गजानन चव्हाण, अक्षय वाघ, आकाश सातव, मंगेश सुकळकर, संदीप गोरडे, वसीम शेख, सुलतान शेख, रघू दवणे, बाळू दवणे, अक्षय मार्गमवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अंजनखेडमध्ये पोलिसांची दडपशाही
श्रीकांत शिंदे यांच्या सारखणी दौऱ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांचा सकाळपासूनच आटापिटा चालला होता. शिंदे नांदेडात येण्यापूर्वीच पोलिसांनी जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांना ताब्यात घेतले. खराटे यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या अंजनखेड या गावात पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा दाखल झाला. खराटे यांच्या घरासह गावाला वेढा घातला गेला. खराटे यांना ताब्यात घेऊन सिंदखेड पोलीस ठाण्यात आणून नजरपैद करण्यात आले. तिथे शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यात आला.
उद्धव ठाकरे यांचा फोन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून त्यांची तसेच आंदोलनात सहभागी शिवसैनिकांची चौकशी केली. तुम्ही चांगले काम करत आहात. गद्दारांच्या विरोधातील निष्ठावंतांची ही लढाई अशीच पुढे चालू ठेवा, असे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितले.




























































