Ratnagiri News – दोन एसटींची समोरासमोर धडक; 11 विद्यार्थ्यांसह चालक जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिरजोळे-उक्षी मार्गावरील शीळ-पवार स्टॉप येथे आज (०२ जुलै २०२६) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ११ विद्यार्थी व एक एसटी चालक किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व जखमींवर रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चालक वलीखान पठाण हे आपल्या ताब्यातील एसटी बसमधून वाहक अमोल शिवलकर आणि विद्यार्थ्यांना घेऊन भावेआडम येथून रत्नागिरीच्या दिशेने येत होते. याच सुमारास चालक प्रफुल्ल नागवेकर हे दुसरी एसटी बस घेऊन वाहक गुरु मुद्रे आणि इतर प्रवाशांना घेऊन रत्नागिरी ते दांडेआडम असे जात होते. या दोन्ही बसेस शीळ-पवार स्टॉप येथे समोरासमोर आल्या असता, विद्यार्थी घेऊन रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटीवरील चालक वलीखान पठाण यांचा भरधाव बसवरील ताबा सुटला. त्यामुळे त्यांची बस रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या दुसऱ्या एसटीला जोरात धडकली. या धडकेत दोन्ही एसटींच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातात एसटी चालक वलीखान गुलाबखान पठाण (वय ३७, रा. माळनाका, रत्नागिरी) यांच्यासह तन्वी रेवाळे (१९), सिद्धेश खापणे (१७), तेजस्विनी खापणे (१७), कल्याणी रेवाळे (१७), श्रुती तांबे (१७), सदिच्छा सनगरे (२१), आर्या जाधव (२१, सर्व रा. दांडेआडम, रत्नागिरी) आणि स्नेहल खापणे (१७), सुजल सनगरे (१७), प्रतीक तांबे (१८), आदिती तांबे (१७, सर्व रा. भावेआडम, रत्नागिरी) हे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी चालक आणि विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघाताचे वृत्त समजताच विद्यार्थ्यांच्या पालकांनीही रुग्णालयात गर्दी केली होती. या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात सुरू होती. अपघाताची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत, आदेश भाटकर उपस्थित होते.