
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सचिन अहिर यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी असे म्हटले आहे. तसेच आपल्या सरकारचा पक्षांतरबंदी कायदा हा आता कचऱ्याच्या डब्ब्यात टाकण्याच्या लायक झालाय, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
”ज्या प्रकारचे राजकारण गेल्या चार पाच वर्षात सुरू आहे लोकशाहीची हत्या केली जात आहे. खासदार आमदारांची खरेदी विक्री सुरू आहे. मोठ मोठ्या रकमा लावल्या जातात. शिवसेनेचे खासदारही तसेच दुसऱ्या गटात गेले. पक्षांतर कायद्याच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. सर्वोच्च न्यायालय त्यावर काही निर्णय देत नाहीये. सर्वोच्च न्यायालय पक्षबदलावर काहीही बोलत नाहीये. त्याचा फायदा जे कुणी हे केले त्यांना होत आहे”, असे चव्हाण म्हणाले.
सचिन अहिर यांचे सदस्यत्व रद्द व्हायला हवे
”सचिन अहिर माझ्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. ते माझे मित्र आहेत. पण हे जे काही त्यांनी केले त्याचे मी समर्थन नाही करू शकत नाही. त्यांचे निलंबन व्हायला हवे. त्यांचे सदस्यत्व रद्द व्हायला हवे. पक्षांतरबंदी कायदा हा हिंदुस्थान सरकारचा कायदा आहे. त्याचे उल्लंघन झाले आहे. त्यासाठी त्यांचे निलंबन करायला हवे. मुख्यमंत्री काहीही म्हणत असतील पण त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी”, असेही चव्हाण म्हणाले.
”सर्वोच्च न्यायालयाने अद्याप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी ज्या प्रकारे पक्ष बदलले ते योग्य आहे की चुकीचे त्याचा निर्णयच नाही दिला. त्यामुळे हे आता चालूच राहणार. आता पक्षांतरबंदी कायदा हा कचऱ्याच्या डब्ब्यात टाकण्याच्या लायक झालाय”, अशी जळजळीत टीका देखील त्यांनी केली.































































