
हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. भूस्खलन, अचानक आलेले पूर आणि इतर पावसाशी संबंधित घटनांमुळे राज्यातील परिस्थिती गंभीर बनली असून, आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागांतील रस्ते बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली असून, वीज आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे.
राज्य आपत्कालीन कार्य संचालन केंद्राने (SEOC) दिलेल्या माहितीनुसार, 30 जून ते 2 जुलैदरम्यान झालेल्या सततच्या पावसामुळे राज्यभरात 49 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यामध्ये कुल्लू जिल्ह्यातील सर्वाधिक 30 रस्त्यांचा समावेश आहे. याशिवाय सिरमौरमध्ये आठ, चंबामध्ये सात, तर लाहौल-स्पिती आणि उना जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन रस्ते बंद आहेत.
मुसळधार पावसाचा फटका वीजपुरवठ्यालाही बसला आहे. राज्यातील 42 वीज ट्रान्सफॉर्मर (डीटीआर) बंद पडले असून, त्यामुळे अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. सिरमौर जिल्ह्यातील नाहन उपविभागात सर्वाधिक 27 ट्रान्सफॉर्मर बंद आहेत. चंबा, कुल्लू, मंडी आणि लाहौल-स्पिती जिल्ह्यांनाही त्याचा फटका बसला आहे. पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावरही गंभीर परिणाम झाला आहे. चंबा जिल्ह्यातील एकूण 27 पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्या असून, त्यापैकी तीन योजना चंबा उपविभागातील तर 24 योजना तीसा उपविभागातील आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे.
एसईओसीच्या अहवालानुसार, 30 जूनपासून सुरू झालेल्या मान्सूनच्या तडाख्यात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये कांग्रा जिल्ह्यातील चार, शिमलामधील तीन, तर मंडी, कुल्लू, चंबा, लाहौल-स्पिती आणि हमीरपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. पाण्यात बुडणे, विजेचा धक्का लागणे तसेच झाड किंवा दगड कोसळणे अशा विविध घटनांमध्ये हे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.




























































