
राम मंदिराच्या आंदोलनासाठी कारसेवकांनी सोसलेले अत्याचार, रक्त आणि कष्टाचे भांडवल करून अमर्याद सत्ता भोगणाऱ्या भाजपच्या काळात थेट प्रभू श्रीरामाच्या मंदिरातच दरोडा टाकला जात आहे. हिंदुत्वाचा बुरखा घालून राम मंदिर लुटणाऱ्यांचा पैसा इतर राजकीय पक्ष आणि आमदार-खासदार फोडण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकले आहे. भाजपच्या हिंदुत्वाचा बुरखा फाडण्यासाठी रविवारी 5 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता दादर येथील मारुती मंदिरासमोर शिवसेना रामरक्षा आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली. मातोश्री निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊतही उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “संपूर्ण देशामध्ये गोंधळ उडालेला असून सर्वसामान्यांमध्ये अनास्था निर्माण झालेली आहे. कुणी कुणाला कुणाचे उत्तरदायी नाही असे चालले आहे. याच्या मूळावर आघात करण्याची वेळ आलेली आहे. संपूर्ण देश भाजपच्या अंमलाखाली आहे. भाजपचे सत्तेचे मूळ राम मंदिर असून राम मंदिराच्या आंदोलनात आम्ही सुद्धा सहभागी होतो. राम मंदिर आंदोलनामध्ये अनेक शिवसैनिक, देशभरातील हिंदू सहभागी झाले होते. तो काळ अनेकांना आठवत असेल. कारसेवकांवर झालेले अत्याचार, गोध्रा हत्याकांड, अहमदाबाद दंगल आणि मुंबईमध्ये जे काही घडले त्याच्यामध्ये हिंदूंनी बरेच काही सोसले.”
“राम मंदिराचे आंदोलन सुरू होण्याच्या आधी संपूर्ण देशात भाजपचे फक्त दोनच खासदार होते. गांधीवादी समाजवाद हा भाजपने अंगीकारलेला कार्यक्रम होता. तो कार्यक्रम सोडून ते हिंदुत्वाकडे वळले. राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला आणि आज देशामध्ये अमर्याद सत्ता भोगत आहेत. भाजपच्या काळामध्ये राम मंदिर हा मुद्दा आज वेगळ्या गोष्टीसाठी चर्चिला जातोय, हे दुर्दैवं आहे. जी काही दरोडेखोरी चालली आहे, राजकीय पक्ष फोडले जात आहेत, आमदार-खासदार चोरले जात आहेत, खरेदी-विक्री होत आहे आणि त्याला ऑपरेशन असे नाव दिले जाते. मग भाजप ऑपरेशन राम मंदिर करत आहे का?”, असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
“राम मंदिर लूटणाऱ्यांना आता हिंदू माफ करणार नाही”
राम मंदिरावर दरोडा टाकला गेला असून त्याचे पुरावेही दिले जात आहेत. काही जणांचे म्हणणे आहे की, हा चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय. हे फार गंभीर आहे. एकदा दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की, अब हिंदू मार नहीं खायेगा… तसे मी आज म्हणतोय की, अब हिंदू माफ नहीं करेगा. जे-जे मंदिर लुटत आहेत, मग ते भाजपचे असो किंवा आणखीन कुणी असतील त्यांना हिंदू माफ करणार नाही. जे-जे मंदिर लुटत आहेत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात करत उद्धव ठाकरे यांनी रविवार 5 जुलै रोजी दादरच्या मारुती मंदिर येथे रामरक्षा आंदोलन आणि महाआरती करणार असल्याची घोषणा केली.
राम मंदिर देणगी घोटाळ्याविरोधात शिवसेनेचे रामरक्षा आंदोलन, उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकले; हिंदुत्वाच्या नावावर लूट सहन करणार नाही!
वाचा सविस्तर-https://t.co/KqK4h4lVvE@ShivSenaUBT_ @rautsanjay61 pic.twitter.com/5x07LHb7yi— Saamana Online (@SaamanaOnline) July 3, 2026
“हिंदुत्वाच्या नावावर लूट सहन करणार नाही”
दादर येथील मारुती मंदिरासमोर होणाऱ्या आंदोलनात जे-जे हिंदू आहेत, ज्यांना-ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी सहन होत नाहीय आणि जाब विचारावा वाटतोय त्या सगळ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. या आंदोलनासाठी मी स्वत: तिकडे जाणार असून माझ्यासोबत शिवसेनेचे नेते, लोकप्रतिनिधी असतील. ज्यांनी-ज्यांनी हिंदुत्व सोडलेले नाही. ज्यांनी-ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाही ते सुद्धा हिंदू असतील तर येऊ शकतात. हिंदूंना जागे करण्यासाठी आम्ही महाआरती करत होतो. आता हिंदू जागा झाला असून राम मंदिरातील लुटीचा जाब विचारण्यासाठी रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि हनुमान चालिसा म्हणू. ही सुरुवात असून यानंतर राज्यभर जिल्हा पातळीवर, शहरात आणि खेड्या-पाड्यात जिथे राम मंदिर, हनुमान मंदिर असेल तिथे सर्व हिंदू, रामभक्त आणि वारकरी… तसेच ज्यांच्या मनात राम मंदिराच्या लुटीविरोधात राग आहे ते सगळे एकत्र येऊन भाजपला याचे उत्तरदायित्व स्वीकारायला लावल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्वाच्या नावावर ही लूट आम्ही सहन करू शकत नाही. राम मंदिरासाठी ज्यांनी रक्त सांडले, तुरुंगवास भोगला त्या सगळ्यांचे कष्ट आम्ही वाया जाऊ देणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
“हिंदुत्वाचा बुरखा घालून राम मंदिर लुटणारे देशद्रोह करत आहेत”
राम मंदिराचे आंदोलन देशव्यापी होते. शिवसेनाप्रमुख हे अक्षरश: राज्यभर फिरले होते. संपूर्ण राज्य शिवसेनाप्रमुखांनी पेटवले होते. महाराष्ट्राकडून स्फूर्ती घेऊन आडवाणी यांनी रथयात्रा काढली. भाजपच्या लोकांना सुद्धा राम मंदिरात जे सुरू आहे, ते पटत नाही त्यांनी पुढची रथयात्रा काढायला हरकत नाही. त्याच्यातही शिवसेना सहभागी व्हायला तयार आहे. देशभर हे आंदोलन झाले पाहिजे. जे-जे हिंदूंच्या भावनांशी खेळत आहेत, हिंदुत्वाचा बुरखा घालून राम मंदिर लुटत आहेत, ते देशद्रोह करत आहेत. याविरोधात देशभरात आंदोलन सुरू झाले असून महाराष्ट्रही मागे राहणार नाही. महाराष्ट्र नेतृत्व करेल. महाराष्ट्र एकदा जागा झाला की संपूर्ण देश जागा होतो. त्यामुळे आधी महाराष्ट्रातून सुरुवात करेल आणि नंतर अयोध्येलाही जाईल. राम मंदिराची निर्मिती झाली तेव्हा आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो. अयोध्या ही रामजन्मभूमी असून तिथे राम मंदिर आहे. पण आमचा राम हृदयात आहे. हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम हे आमचे हिंदुत्व आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. राम मंदिर देणगी घोटाळ्यातील आरोपींना भाजप राज्यपाल किंवा मंत्रीपद देतील असे होता कामा नये, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.






























































