
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरातील अस्थिरता कमी होण्याचे संकेत मिळत आहे. अमेरिकेचा Employment Data आला आहे. त्यातील रोजगाराच्या कमकुवत आकडेवारीमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही कमोडिटी बाजारांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १,३७१ ने वाढून १,४३,००० वर आला आहे. चांदीचा भावही ३,४०० ने वाढून प्रति किलोग्रॅम २,२९,००० झाला आहे. शुक्रवारी सकाळी ७:३० वाजता COMEX वर सोन्याचा भाव प्रति औंस $४,१९८.५० पर्यंत आला. COMEX वर चांदीचा भाव सध्या प्रति औंस $६२.५६० आहे, जो काल प्रति औंस $६० च्या खाली घसरला होता.
अमेरिकेतील रोजगाराच्या कमकुवत आकडेवारीनंतर सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरू झाली आहे. आज COMEX वर सोन्याचे दर $७२.८० ने वाढून $४,१९८.५० प्रति औंस झाले. देशांतर्गत कमोडिटी बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरू आहे.
MCX वर सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १४७,६४८ पर्यंत वाढला. चांदीचा भावही ५,००० ने वाढून प्रति किलोग्रॅम २,३७,३२५ झाला. अमेरिकी सरकारच्या रोजगाराची आकडेवारी यावेळी कमकुवत राहिली. या आकडेवारीनंतर, मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोने आणि चांदीच्या दरातही वाढ झाली. गुरुवारी, सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १,४५,७२३ आणि चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम २,३३,२०० वर बंद झाला होता. शुक्रवारी त्यात मोठी वाढ दिसून आली.
जून महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली. केवळ एका महिन्यात, सोन्याच्या दरात अंदाजे १३,००० ची, तर चांदीच्या दरात ३०,००० पेक्षा जास्त घसरण झाली. या घसरणीनंतर, सराफा बाजारात खरेदीदारांची मोठी गर्दी झाली. तथापि, आता बाजारात पुन्हा तेजी आली आहे. मात्र, ही वाढ टिकून राहील की नाही याबाबत तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केी आहे.
सोने आणि चांदीच्या किमतींवर भू-राजकीय तणाव, अमेरिकेतील व्याजदर, डॉलरमधील चढ-उतार आणि मध्यवर्ती बँकेकडून होणारी सोन्याची खरेदी यांचा सर्वाधिक प्रभाव पडतो. व्याजदर दीर्घकाळ उच्च राहतील असे संकेत मिळत होते, ज्यामुळे कमोडिटी बाजारात सातत्याने घसरण होत होती. परंतु अमेरिकेतील रोजगाराच्या कमकुवत आकडेवारीमुळे डॉलरची घसरण आणखी वाढली, ज्यानंतर सोने आणि चांदीच्या किमती वाढू लागल्या. नोकऱ्यांमध्ये घट होणे म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था वेगाने वाढत नाहीये, ज्याचा थेट परिणाम डॉलरवर होतो. डॉलर कमजोर झाल्यामुळे सोने आणि चांदीची खरेदीही वाढते, ज्यामुळे त्यांच्या किमती वाढतात.





























































