‘एफडीए’चा दणका; पुण्यातील सात हॉटेल्स, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई करत पुणे विभागातील सात हॉटेल व रेस्टॉरंटचे परवाने निलंबित केले आहेत. या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

सिंहगड रस्त्यावरील हॉटेल ग्रँड पुरंदर, क्राऊन बेकर्स, आंबेगाव येथील मे. अॅग्रोटीस केटरिंग, वाघोली येथील बरकत बिर्याणी हाऊस, रॉयल बिर्याणी हाऊस आणि बावधन येथील नॅशनल ३६० या हॉटेलचा समावेश आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, हॉटेल व रेस्टॉरंट चालकांनी स्वच्छता राखणे, अन्न सुरक्षा कायद्याचे काटेकोर पालन करणे, ग्राहकांना मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना ‘एफडीए’कडून देण्यात आल्या आहेत. तसेच अन्नाच्या गुणवत्तेबाबत किंवा सुरक्षेबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहनही ‘एफडीए’ने केले आहे.

मोहीम सुरूच राहणार

विनापरवाना किंवा नियमबाह्य पद्धतीने अन्न व्यवसाय करणाऱ्या, दर्जाहीन, भेसळयुक्त अन्नपदार्थांचे उत्पादन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कठोर कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचे ‘एफडीए’चे सहआयुक्त दि. वा.भोगावडे यांनी सांगितले.

२३० किलो तुपाचा साठा जप्त

पिंपळे गुरव येथील मे. देवांश मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्सचीही ‘एफडीए’कडून तपासणी करण्यात आली. या तपासणीत ९० हजार ५०० रुपये किमतीचा २३० किलो तुपाचा साठा विनालेबल व भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला.