
भिवंडी शहरातील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने ‘ऑपरेशन डिग्री चेक’ सुरु केले आहे. पालिकेने ४५२ डॉक्टरांच्या पदव्या तपासल्या आहेत. या शोधमोहिमेत ७८ बोगस डॉक्टर सापडले आहेत. या मुन्नाभाईंच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून बोगस डॉक्टरांच्या विरोधात पालिकेचा आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आल्यानंतर वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शहरात डॉक्टर डेनिमित्त वैद्यकीय व्यावसायिकांचा सन्मान होत असतानाच भिवंडी आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी केलेल्या पाहणीत एका बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री यांच्या आदेशान्वये आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. नंदापूरकर यांनी भिवंडी पालिका वैद्यकीय विभागास भेट दिली. त्यानंतर भिवंडी शहरातील बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध सुरू केला असता पद्मानगर येथील डॉ. मल्लेश गाजंगी हे इलेक्ट्रोपॅथीचे डॉक्टर परवानगी नसताना ॲलोपॅथीचे उपचार करताना आढळून आले. तेथे इंजेक्शन व औषधांचा साठा आढळून आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती भिवंडी पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी दिली आहे.
-
शहरातील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी उपसंचालक डॉ. नंदापूरकर यांनी पालिका मुख्यालयात वैद्यकीय अधिकारी, नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी भिवंडी शहरामध्ये अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
-
वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी शहरात आतापर्यंत एकूण ७८ बोगस डॉक्टरांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. तसेच शहरातील एकूण २० नागरी आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची यादीही तयार केली आहे.
-
भिवंडी शहरात प्रॅक्टिस करणाऱ्या ४५२ डॉक्टरांचे पदवी प्रमाणपत्र तपासण्यात आले आहे. त्यामध्ये ३३ वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची वैद्यकीय शिक्षण प्रमाणपत्रे संशयास्पद आहेत. त्यामुळे या कागदपत्रांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. जर ही प्रमाणपत्रे बनावट निघाली तर संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे उपसंचालक डॉ. नंदापूरकर यांनी सांगितले.




























































