
फुटबॉल विश्वचषकामध्ये भल्याभल्या संघांना टक्कर देणाऱ्या कोल्हापूरपेक्षाही छोट्या असणाऱ्या केप वर्डेने शनिवारी गतविजेत्या अर्जेंटिनालाही घाम फोडला. उपउपांत्यपूर्व फेरीच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत केप वर्डेने अर्जेंटिनाला विजयासाठी 120 मिनिटे झुंजवले. शेवटच्या काही मिनिटांमध्ये नशिबाची साथ मिळाल्याने अर्जेंटिनाने केप वर्डेचा 3-2 असा पराभव करत उपांत्यपूर्वफेरीमधील स्थान निश्चित केले. सामना जरी अर्जेंटिनाने जिंकला असला तरी पहिल्यांदाच विश्वचषक खेळणाऱ्या केप वर्डेच्या झुंजार खेळाचे फुटबॉल चाहत्यांनी तोडभरून कौतुक केले.
मियामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लिओनेल मेस्सीने सुरुवातीलाच आपला दबदबा निर्माण केला. अर्जेंटिनाने चेंडूवर ताबा मिळवत केप वर्डेवर दबाव आणला. सामन्याच्या 29 व्या मिनिटाला लिसँड्रो मार्टिनेझने दिलेल्या एका उत्कृष्ट पासवर मेस्सीने गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिला. विशेष म्हणजे या गोलसह मेस्सी विश्वचषक इतिहासात 20 गोल करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला.
मेस्सीच्या ऐतिहासिक गोलनंतरही केप वर्डेचा संघ डगमगला नाही. केप वर्डेचा गोलरक्षक वोझिन्हा याने अर्जेंटिनाचे अनेक आक्रमण रोखून धरले. मध्यांतरापर्यंत अर्जेंटिनाने आघाडी कायम राखली होती. मात्र सेकंड हाफमध्ये केप वर्डेने वेगवान खेळ केला. रायन मेंडेसच्या एका सुंदर पासवर डेरॉय दुआर्तेने कोणतीही चूक न करता अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझला चकवून गोल केला आणि सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.
🇦🇷 Argentina have qualified for the Round of 16!#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 4, 2026
निर्धारित 90 मिनिटांपर्यंत सामना 1-1 अशा बरोबरी होता. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळेच्या सुरुवातीलाच 93 व्या मिनिटाला मेस्सीच्या कॉर्नरवरून मिळालेल्या चेंडूवर लिसँड्रो मार्टिनेझने एक वादळी शॉट मारत अर्जेंटिनाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. केप वर्डेचे आव्हान इथेच संपले असे वाटत होते. मात्र हार न मानता केप वर्डेने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला आणि 103 व्या मिनिटाला सिडनी कॅब्रालने गोल करत 2-2 अशी थरारक बरोबरी साधून दिली.
FIFA World Cup 2026 – स्पेनकिलर! ऑस्ट्रियावर 3-0 असा एकतर्फी विजय; ओयार्झाबालचे दोन गोल
सामना पेनल्टी शूटआऊटच्या दिशेने झुकत असतानाच अर्जेंटिनाला नशिबाची साथ मिळाली. ख्रिस्तियन रोमेरोने मारलेला एक शॉट केप वर्डेच्या खेळाडूला लागून थेट जाळ्यात गेला. या डिफ्लेक्टेड गोलमुळे अर्जेंटिनाने 3-2 अशी आघाडी घेतली. ही आघाडी कायम राखत अर्जेंटिनाने उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला. अर्थात अर्जेंटिनाने आपल्या अनुभवाच्या जोरावर हा सामना जिंकला असला, तरी हा सामना नवख्या आणि जिगरबाज खेळणाऱ्या केप वर्डे संघासाठी दीर्घकाळ लक्षात ठेवला जाईल.


























































