राज्यात धुवाधार आणि दाणादाण! 64 ठिकाणी झाडे कोसळली, पालिकेचे 10 हजार कर्मचारी तैनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यभरात शनिवारी सकाळपासून कोसळलेल्या धुवांधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडवली. पावसाने दिवसभर धुमाकूळ घातल्याने मुंबईतील अनेक सखल भागांत गुडघाभर पाणी साचले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले, बरेच रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. मुंबईतील काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. राज्यातील नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले. मुसळधार पाऊस झाल्याने राज्यातील काही धरणांचे दरवाजे उघडावे लागले. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरमधील शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा आणि शासकीय कार्यालयांवरही पावसाचा परिणाम पाहायला मिळाला. शनिवारच्या पावसाने मुंबईकरांची चांगलीच दैना उडवली.

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे गुडघाभर पाण्यातून प्रवाशांसह वाहनचालकांना वाट काढावी लागली. पश्चिम उपनगरात पावसाचा जोर सर्वाधिक होता. पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून या नाल्याच्या प्रवाहाशी जोडलेले नालेही भरून वाहत आहेत. पावसाचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाला असून रेल्वे वाहतूकही कोलमडली आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू होती. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कामावर जाणाऱया चाकरमान्यांची रखडपट्टी झाली.

काही रस्त्यांवर वाहतूक बंद

मुसळधार पावसामुळे चेंबूर येथील नूर-ए-इलाही सेवा रस्ता, अंधेरी येथील वीरा देसाई रस्ता, महानगरपालिका बाजारपेठ रस्ता, स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, विक्रोळी येथील हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन तसेच परेश पार्क बाजारपेठ येथील रस्ते खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात आले होते. पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुपार सत्रातील शाळांना सुट्टी

मुंबईत अतिमुसळधार पावसामुळे दुपारच्या सत्रातील शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. यातच उद्या रविवारीदेखील पावसाचा ‘रेड अलर्ट’ हवामान खात्याने दिल्याने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पालिकेचे 10 हजार कर्मचारी तैनात

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालिकेचे दहा हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी विविध भागांमध्ये प्रत्यक्ष क्षेत्रावर तैनात असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती उपाययोजना करीत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

सर्व परिमंडळ उपायुक्त आणि सर्व सहाय्यक आयुक्त (प्रभाग अधिकारी) आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱयांनी कार्यालयात किंवा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहावे, असे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहे.

शिवडी, काळाचौकीत उघडय़ा मॅनहोलचा धोका

शिवडी, काळाचौकी परिसर प्रभाग क्रमांक 206 या परिसरात पाणी तुंबत आहे. येथे अनेक मॅनहोल उघडे आणि धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे दुर्घटना घडून जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची मुंबईतील विविध ठिकाणी जाऊन पावसातल्या मुंबईतील परिस्थितीचा जाऊन आढावा घेतला. गोरेगावला असलेल्या ओबेराय मॉल इथे उघडय़ा मॅनहोलच्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी करून पालिका प्रशासनाला आवश्यक सूचनाही दिल्या.

  • सब वेच्या ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी आवश्यक प्रमाणात पंपांची व्यवस्था केल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र अंधेरी, मालाड आणि मिलन सब वेमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने या ठिकाणी वाहतूक बंद करावी लागली.

64 ठिकाणी झाडे कोसळली

जोरदार वाऱयासह झालेल्या पावसामुळे मुंबईत शहर विभागात 10 ठिकाणी, पूर्व उपनगरात 18 तर पश्चिम उपनगरात 36 अशा 64 ठिकाणी झाड, फांदी कोसळल्याच्या घटना घडल्या.

कुलाबा परिसरात ताज

हॉटेलजवळील रे हाऊस बेस मार्गावर असलेले झाड कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही,परंतु एका वाहनाचे नुकसान झाले.

मुंबईत नऊ ठिकाणी घराची भिंत कोसळण्याच्या घटनाही घडल्या. यामध्ये बैगनवाडी येथील तळमजला अधिक एक असलेले बांधकाम कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले.

जुहूमध्ये रस्त्यांवर नदी

विलेपार्ले पूर्व आणि जुहू येथील नेहरू मार्गावर आणि साकीनाका येथे दीड फूट पाणी साचल्याने त्यामुळे या मार्गावर वाहतुकीला फटका बसला. तर बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यासमोरही पाणीच पाणी जमले. जुहू परिसरातील रस्त्यांवरदेखील पाणी साचल्याने नदीचे स्वरूप आले.

नवी मुंबई

धुवाधार पावसामुळे ठाणे-बेलापूर मार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. तुर्भे रेल्वे स्थानक परिसरातील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना गाडय़ा चालवतो की होडय़ा हेच कळत नव्हते. या ठिकाणी रस्ता ओलांडताना पादचाऱयांना मोठी कसरत करावी लागली. महापे एमआयडीसीतील रस्ता पूर्णपणे जलमय झाल्याने त्याचा मोठा फटका कामगार आणि कर्मचाऱयांना बसला. या पाण्यामुळे स्कुटी, स्कूटर आणि अन्य दुचाकी वाहने बंद पडली.

नालासोपारा

नालासोपाऱ्यात आज पावसाने पुरती दाणादाण उडवली. छेडानगर येथील सगळे रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले. त्यामुळे नागरिक घरातून बाहेरही पडले नाहीत. तुळींज येथील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले. अनेक गृहसंकुले आणि दुकानांत पाणी शिरले. अलायन्स हॉस्पिटल रोड येथील रस्ताही पाण्याखाली गेला होता. नगिनदास परिसरातील अनेक रस्त्यांवर पंबरभर पाणी साचले होते. धानीवबाग येथील रस्तेही जलमय झाले.