
विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप झाला. विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या जवळपास 60 आमदारांनी आणि 20 खासदारांनी बंडखोरी केली. एवढेच नाही तर फुटीर आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या ऋतब्रता बॅनर्जी यांनी टीएमसीच्या कोलकाता येथील पक्षाच्या मुख्यालयावरही दावा सांगितला. त्यामुळे ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या असून बंडखोरांवर हल्ला केला आहे. निवडणुकीच्या आधी तुमचे हे बंड कुठे होते? असा संतप्त सवाल करत ममता बॅनर्जी यांनी बंडखोर नेत्यांना थेट भाजपमध्ये जाहीरपणे सामील होण्याचे आव्हान दिले आहे. पक्षाला आतून पोखरण्यापेक्षा समोर येऊन लढा, असे आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिले.
ममता बॅनर्जी यांनी शनिवारी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी आणि पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी टीएमसीच्या बंडखोर नेत्यांसह भाजपवर हल्ला चढवला. मी त्या विश्वासघातकी आणि कृतघ्न गद्दारांना आव्हान देते, जे पक्ष सोडून जात आहेत; त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करावा आणि हिंमत असेल तर माझ्याशी लढावे. भाजप पुरस्कृत हा अप्रामाणिक खेळ त्यांनी थांबवावा, असे आव्हानच ममता बॅनर्जी यांनी दिले.
ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी चंद्रिमा भट्टाचार्य यांनी टीएमसीच्या पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्षपदाचा आणि इतर जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला. यानंतर ममता बॅनर्जी लाईव्ह आल्या. चंद्रिमा काही काळापासून राजीनामा देण्याबाबत बोलत होती. तिचा मुलगा आधीच बंडखोरांना जाऊन मिळाला आहे. त्यामुळे काही नेत्यांनी पक्ष सोडला आणि भाजपने त्यांना सोबत घेतले, तरी मला काही फरक पडत नाही, असे त्या म्हणाल्या. तसेच ज्येष्ठ नेते सुब्रत बक्षी सध्या आजारी असल्याने, ते बरे होईपर्यंत ममता बॅनर्जी यांनी तात्पुरत्या स्वरूपात बंगाल प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वतःच्या हाती घेतली आहे. यासोबतच त्यांनी कुणाल घोष आणि मदन मित्रा यांची पक्षाचे नवे सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे.
ज्ञानेश कुमार नाही, तर व्हॅनिश कुमार!
ऋतब्रता बॅनर्जी यांच्या गटाने टीएमसीच्या निवडणूक चिन्हावर दावा करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. यावर बोलताना ममता बॅनर्जी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नावाचा उपरोधिक उल्लेख व्हॅनिश कुमार असा केला. मला पक्षाच्या चिन्हाची काळजी नाही, तरीही मला माहित आहे की ते हे चिन्ह हिरावून घेऊ शकत नाहीत. ते यशस्वी होणार नाहीत, कारण मी हे चिन्ह माझ्या गळ्यात अडकवून लोकांपर्यंत पोहोचेन. अनेक जणांनी पक्षाचा विश्वासघात केला. ते केवळ मी त्यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी केली म्हणूनच निवडून आले होते. पण त्यांनी माझ्या आवाजाची गळचेपी करण्यासाठी व्हॅनिश कुमारचा वापर केला, तरीही ते माझा आवाज दाबू शकणार नाहीत. व्यक्ती येतात आणि जातात, पण संस्था कधीच नष्ट होत नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
“कार्यालयाला कुलूप ठोकू शकता, पण…”
तृणमूल काँग्रेसची मालमत्ता कोणीही लूटू शकत नाही. तुम्ही आमच्या कार्यालयांना कुलूप लावू शकता, पण लोकांच्या हृदयाला कुलूप लावू शकत नाही, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्यावरही निशाणा साधला. जे आज मुख्यमंत्री झाले आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की ते कधीकाळी तृणमूल आणि काँग्रेसमध्ये होते. ते अनेकदा निवडणुका हरले आणि मी स्वतः त्यांच्या मतदारसंघात प्रचारासाठी गेले होते. ते माझे कर्तव्य होते, असे त्या म्हणाल्या.

























































