जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; खेड शहरात पूर, बाजार पुलावर पाणी आल्याने चिपळुणात पुराचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून पुराचे पाणी खेड शहरातील बाजारपेठेत शिरले आहे. चिपळूणला पुराचा धोका निर्माण झाला असून शहरातील बाजार पुलावर पुराचे पाणी आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १०९ मिमी पाऊस पडला. मंडणगड १३२.२५ मिमी, दापोली १४९.४२ मिमी, खेड १२५.४२ मिमी, चिपळूण ७२ मिमी, गुहागर १३०.७७ मिमी, संगमेश्वर ७९.९१ मिमी, रत्नागिरी ५२.७७ मिमी, लांजा ८७.८० मिमी, राजापूर १५५ मिमी पाऊस पडला.

खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पुराचे पाणी खेड बाजारपेठेत शिरले आहे. बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. वशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. चिपळूण शहरातील बाजार पुलावर पुराचे पाणी आल्याने चिपळूण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नारंगी नदी तुडुंब भरली

गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी व नारंगी नदीला पूर आला आहे. जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून पाणीपातळी सद्यस्थितीत ९.८० मीटर आहे. दरम्यान, खेड तालुक्यातील नारंगी नदीलाही पूर आला असून नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. त्यामुळे खेड-दापोली हा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून, शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. खेड-खाडीपट्टा मार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. आजही पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे आंबवली, निळीक व खाडी पट्ट्याकडे सर्व वाहतूक ठप्प झाली. पुढील ४८ तास जोरदार पावसाचा इशारा असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.