
संततधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड येथील लक्ष्मीबाग नजीकच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या केबिनवर मोठी दरड कोसळली. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत एका अज्ञात मनोरुग्णाचा मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी कामाला असणारे जेद त्यागी (१८), सुवेल त्यागी (१९), महंमद साहवेज (२२, तिघेही रा. उत्तर प्रदेश) हे तीन परप्रांतीय कामगार जखमी झाले आहेत. मनोरुग्ण व्यक्ती शनिवारी भिजलेल्या अवस्थेत पेट्रोल पंपाच्या केबिनमध्ये आश्रयाला आली होती.
बोरज धरण ओव्हरफ्लो
खेड तालुक्यातील ब्रिटिशकालीन बोरज धरण अखेर मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले आहे. खेड शहराला गुरुत्वीय पद्धतीने पाणीपुरवठा करणाऱ्या या महत्त्वाच्या धरणात यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असून, त्यामुळे खेडकरांची पाणीटंचाईची चिंता दूर झाली आहे.
हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित, प्राथमिक आश्रमशाळा जावडे येथे विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक भात लावणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी भातशेतीचा, लावणीचा अनुभव घेतला. संस्थाप्रमुख संतोष कांबळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
खेड-खोपी-धामणंद मार्ग वाहतुकीसाठी बंद
खेड तालुक्यातील खेड-खोपी-धामणंद मार्गावरील कासई शिंदेवाडी येथे मोठी दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरड कोसळताना रस्त्याचा काही भागही खचून वाहून गेला. त्यामुळे हा मार्ग सध्या धोकादायक बनला असून प्रशासनाने तो तात्पुरता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे.
कुडाळला पावसाने झोडपले; विजेच्या धक्क्याने म्हशींचा मृत्यू
कुडाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम आहे. आज दिवसभर संततधार सुरू होती. वाऱ्यामुळे पडलेल्या विद्युत भारीत तारेच्या स्पर्शाने मांडकुली पेडणेकरवाडी येथील दोन म्हशी दगावल्या, तर काही जनावरांना गंभीर दुखापत झाली आहे. सकाळी सात वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेतून सुदैवाने प्रथमेश अणसुरकर हा तरुण बचावला. तसेच ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे पडझड होऊन नुकसान झाले. सततच्या पावसामुळे कुडाळ शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठाही विस्कळीत झाला होता. तालुक्यात गेल्या २४ तासांत ६९ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
तुळशी हद्दीत दरड कोसळली; पावसामुळे विद्युतपुरवठा खंडित
मुसळधार पावसामुळे तुळशी माहू घाटात दरड कोसळली. त्यामुळे मंडणगड, देव्हारे, बाणकोट, वेळास तसेच दापोली तालुक्यातील मांदिवली, केळशी, आडे, उटंबर गावांकडून मंडणगड मार्गे पुणे-मुंबईकडे जा-ये करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. पावसामुळे रविवारी दुपारपासून संपूर्ण परिसराचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता.
अर्जुना-कोदवली नद्यांना पूर
अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने पुराचे पाणी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जवाहर चौकात शिरले. पुराच्या पाण्यामुळे जवाहर चौकातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. शहरातील टपऱ्या आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने राजापूर, गोठणे, दोनिवडे, सौंदळ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसामुळे घरांचे नुकसान झाले आहे.
दापोलीत मुसळधार
दापोली तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. नेहमी गजबजलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पुराच्या पाण्याने वेढला गेल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. दापोली-हर्णे व दापोली-दाभोळ मार्गांवरही पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. जालगाव येथील खलाटी परिसरात पाणी शिरल्याने घरांचे नुकसान झाले.
उक्षी पूल रस्त्यावर वाहनांची घसरगुंडी
संगमेश्वर ः मुंबई-गोवा महामार्गावरील उक्षी पूल रस्त्यावर चिखल-मातीचा थर जमल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांची घसरगुंडी होत आहे. महामार्गाचे काम अत्यंत धिम्या आणि ढिसाळ गतीने सुरू असल्याचा फटका सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालकांना बसू लागला आहे. या परिसरात महामार्गाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे, परंतु ते पूर्णपणे अर्धवट अवस्थेत आहे. कामाच्या नियोजनावरील त्रुटींमुळे माती आणि चिखल थेट रस्त्यावर वाहून येत आहे. विशेष म्हणजे, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था किंवा चर खोदण्यात आलेले नाहीत.































































