हिंदुस्थानी पासपोर्टच्या जागतिक क्रमवारीत मोठी घसरण, काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स २०२६ मध्ये हिंदुस्थानी पासपोर्टची क्रमवारी घसरून १२५ व्या स्थानावर आल्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे हिंदुस्थानची जागतिक प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप खरगे यांनी केला आहे. तसेच वाढवलेल्या पासपोर्ट शुल्कावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले.

मल्लिकार्जुन खरगे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींच्या २०१८ मधील एका वक्तव्याचा संदर्भ दिला आहे. “परदेशात राहणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्या हिंदुस्थानींना आज हिंदुस्थानी पासपोर्टचा सन्मान आणि ताकद माहीत आहे,” असे मोदी म्हणाले होते. खरगे यांनी प्रश्न विचारला आहे की, “ही ताकद आता कुठे दिसत आहे? वास्तवातील आकडेवारी पंतप्रधानांचे दावे खोटे ठरवत आहे.”

खरगे यांनी वेगवेगळ्या जागतिक पासपोर्ट रँकिंगचा दाखला देत हिंदुस्थानचे स्थान घसरत असल्याचे निदर्शनास आणले. “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका जागतिक क्रमवारीत हिंदुस्थान २०१३ मधील ७४ व्या स्थानावरून जून २०२६ मध्ये ८० व्या स्थानावर घसरला आहे. तर, ग्लोबल सिटिझन सोल्यूशन्सच्या ताज्या इंडेक्समध्ये हिंदुस्थानची स्थिती अत्यंत निराशाजनक असून, हिंदुस्थान १२५ व्या स्थानावर घसरला आहे,” असे खरगे म्हणाले. ताज्या अहवालानुसार, हिंदुस्थानची १२४ वरून १२५ व्या स्थानी घसरण झाली असून, हिंदुस्थानी पासपोर्टद्वारे सध्या केवळ २६ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळतो. या क्रमवारीत हिंदुस्थान फिलीपिन्स, मोरोक्को, उझबेकिस्तान आणि चीनच्याही मागे आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी पासपोर्टच्या वाढीव शुल्कावरही आक्षेप नोंदवला. १ जुलै २०२६ पासून केंद्र सरकारने पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात वाढ केली आहे. “सेवा सुधारण्याऐवजी मोदी सरकारने पासपोर्ट अधिक महाग केले आहेत. सामान्य पासपोर्टचे शुल्क १५०० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आले आहे, तर तत्काळ पासपोर्टचे शुल्क दुप्पट करून ५००० रुपये करण्यात आले आहे,” याकडे त्यांनी लक्ष वेधले. ६० पानांच्या पासपोर्टसाठी आता ३५०० रुपये, तर तत्काळसाठी ६००० रुपये मोजावे लागणार आहेत. निकृष्ट दर्जाच्या सेवांसाठी नागरिकांकडून जास्त पैसे उकळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.