
हवामान खात्याने नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीला उद्या मंगळवारी ढगफुटीचा, तर जिह्यात इतरत्र अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. एकूण सहा तालुक्यांत हाय अलर्ट असल्याने शाळा, महाविद्यालये, आठवडे बाजार बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. दरड कोसळण्याच्या शक्यतेने रस्ते बंद ठेवले जाणार आहेत. एसडीआरएफची टीम सज्ज राहणार आहे. नागरिकांनी पुढील 48 तास गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहनही केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अत्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन नाशिक, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या तीन तालुक्यांत मंगळवारपासून 36 तासांत ढगफुटीची शक्यता आहे. त्यासह पेठ, दिंडोरी, सुरगाणा अशा सहा तालुक्यांवर जिल्हा प्रशासनाने आपत्ती निवारणाच्या दृष्टीने लक्ष केंद्रित केले आहे. सटाणा, कळवण येथेही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पर्यटनस्थळांवर मज्जाव
त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी, हरिहरगड, पहिने, अंजनेरी गड व परिसरातील सर्वच पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. पुढील आदेश येईपर्यंत ती बंदच असतील. पर्यटकांनी तेथे जाऊ नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर, सुमित निर्मळ यांनी केले आहे.
त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगीदेवी मंदिर बंद राहणार
आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे. सप्तशृंगगडावर ढगफुटीचा अंदाज नसला तरी 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भगवतीदेवी मंदिरही बंद राहील. त्यामुळे या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
शहरातील महापालिका आणि खासगी शाळा, तसेच महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कर्मचाऱयांनी घरूनच काम करावे, अशा सूचना सर्व आस्थापनांना देण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरित व्हावे, इतर भागातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापौर व आयुक्तांनी केले आहे.





























































