पंतप्रधान मोदींच्या वृक्षारोपणावरून वाद, शमी म्हणून लावले पिंपळाचे रोप, हनुमान बेनीवाल यांच्या टीकेनंतर पोस्ट डिलीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच राजस्थानच्या पचपदरा दौऱ्यात ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानाअंतर्गत वृक्षारोपण केले. मात्र या वृक्षारोपणावरून एक नवा राजकीय वाद उभा राहिला आहे. मोदींनी लावलेले रोप भलतेच निघाल्याने विरोधकांनी त्यांना घेरले असून, या प्रकारानंतर पंतप्रधानांच्या सोशल मीडियावरून संबंधित पोस्ट आणि फोटो तातडीने डिलीट करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पचपदरा येथे पंतप्रधान मोदींनी वृक्षारोपण केले. या कार्यक्रमाचे फोटो त्यांच्या X अकाऊंटवरून शेअर करण्यात आले. ‘पर्यावरणाचे रक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी असून पचपदरामध्ये शमीचे रोपटं लावण्याचे सौभाग्य मिळाले’, असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले होते.

पंतप्रधानांची ही पोस्ट पाहिल्यानंतर नागौरचे खासदार आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी थेट मोदींना आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना लक्ष्य केले. बेनीवाल यांनी मोदींना टॅग करत विचारले, “तुम्ही आज राजस्थानच्या पचपदरामध्ये जे झाड लावले, ती तुमच्या सरकारने शोधून काढलेली शमीची एखादी नवीन प्रजाती आहे का? की राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी तुम्हाला पिंपळाचे रोप लावायला लावून त्याला शमीचे नाव दिले आहे?”

बेनीवाल यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. मोदींनी लावलेले रोप शमीचे नसून पिंपळाचे असल्याचे स्पष्ट होताच, पंतप्रधानांच्या X अकाऊंटवरून ती पोस्ट तातडीने हटवली.