
विधानसभेत RTO विभागातील भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली, करचुकवेगिरी आणि नोंदणी प्रक्रियेतील अनियमितता या मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी RTO विभागात मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांच्या ऑडिओ क्लिप्स सभागृहात मांडल्या. नागपूर RTO मध्ये चोरीच्या वाहनांच्या नोंदणीसह मोठ्या गैरव्यवहारांचा आरोपही त्यांनी केला. या रॅकेटमध्ये अधिकाऱ्यांना 15 वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची SIT चौकशी करून कठोर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
बजरंग खरमाटे (निवृत्त RTO अधिकारी), रविंद्र भुयार (प्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला), राजू नागरे (निलंबित मोटार वाहन निरीक्षक, अमरावती), आनंद मोहोड (मोटार वाहन निरीक्षक, गोंदिया), योगेश खेसनार (निलंबित मोटार वाहन निरीक्षक, खामगाव) हे अधिकारी मिळून बेकायदेशीर वसुली करतात. इतकचं नाही तर वसुलीला नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांना टार्गेट करतात. ट्रान्सपोर्टरमार्फत तक्रारदार उभे केले जातात. ACB ट्रॅपसाठी नियोजनबद्ध पद्धतीने परिस्थिती निर्माण केली जाते, अशा अधिकाऱ्यांना अडकवून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा खळबळजनक आरोप वडेट्टीवार यांनी सभागृहात केला. याबाबतच्या ऑडिओ क्लिप देखील वडेट्टीवार यांनी अध्यक्षांना सादर केल्या. महाराष्ट्राचा महसूल बुडत असल्याचा मुद्दा उपस्थित करत महागड्या आयातीत वाहनांची नोंदणी महाराष्ट्राऐवजी इतर राज्यांत करून करचुकवेगिरी होत असल्याचा आरोप केला.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशीची घोषणा केली. IPS अधिकारी प्रियांका ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आली आहे. परिवहन मंत्री यांनी RTO घोटाळ्यात तीन सदस्यीय SIT एका महिन्याच्या आत अहवाल सादर करेल. सभागृहात वडेट्टीवार यांनी घेतलेल्या सर्व नावांची आणि आरोपांची चौकशी केली जाईल. सेवेत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल तपासणी केली जाईल. चौकशी अहवालानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अस परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले.



























































