
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात मंगळवारी (07 जुलै 2026) सकाळी तीन तासांच्या कालावधीत घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. घाटात नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानक दरड कोसळून मोठ्या प्रमाणात दगड रस्त्यावर आल्याने एकेरी वाहतूक सुरू ठेवावी लागली. सुदैवाने दरडीखाली कोणतेही वाहन न आल्याने मोठी दुर्घटना टळली.
संगमनेर खुर्द येथील आनंदवाडी परिसरात ट्रक डिव्हायडरवर चढल्याची घटना घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्याच दिवशी चंदनापुरी घाट परिसरात रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत एका वानराचा जागीच मृत्यू झाला. वन विभागाने घटनास्थळी पंचनामा केला. तर दुसरीकडे याच दरम्यान घाटात नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानक दरड कोसळून मोठ्या प्रमाणात दगड रस्त्यावर आले. घटनेची माहिती मिळताच चंदनापुरी महामार्ग पोलीस, नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चरचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी व क्रेनच्या साहाय्याने मलबा हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. महामार्ग पोलिसांनी टोल कर्मचारी विलास धात्रक, बाळासाहेब ढगे, विवेक वाळे, मतीन शेख यांच्या समन्वयाने काम करून काही वेळातच वाहतूक सुरळीत केली.
वाहनचालकांनी घाट परिसरात वेगावर नियंत्रण ठेवून वाहन चालवावे, असे आवाहन केले आहे. एकाच दिवशी दरड कोसळणे, ट्रकचा अपघात आणि वन्यजीवाचा मृत्यू अशा तीन घटना घडल्याने चंदनापुरी घाटातील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





























































