
पश्चिम बंगालमधील जादवपूरच्या खासदार सयानी घोष यांना मंगळवारी त्यांच्याच लोकसभा मतदारसंघात जनतेच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. बरुईपूर येथे १२ वर्षीय मुलीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी सयानी घोष पोहोचल्या होत्या. यावेळी संतप्त जमावाने त्यांना गद्दार आणि बेईमान म्हणत, गद्दारी करण्यासाठी किती पैसे घेतलेस?’ असा सवाल केला. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
‘कोतो टका बिक्री होले’
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून, यामध्ये जमाव सयानी घोष यांच्या विरोधात गद्दार आणि बेईमान अशा घोषणा देताना दिसत आहे. सयानी घोष त्या भागात पोहोचताच काही लोकांनी ओरडून विचारले, ‘विकले जाण्यासाठी किती रुपये घेतलेस?’. आंदोलनकर्त्यांनी त्यांना दलबदलू असेही म्हटले. एक व्यक्ती वारंवार ‘कोतो टका बिक्री होले…’ (किती रुपयांना विकली गेलीस) असे विचारत होता. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून सयानी घोष यांच्या सुरक्षा रक्षकांना यात मध्यस्थी करावी लागली आणि घोष यांना तातडीने तेथून परतावे लागले.
१९ खासदारांसह केली होती बंडखोरी
दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर जादवपूरच्या खासदार सयानी घोष यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडत गद्दारी केली होती. त्या १९ गद्दार टीएमसी खासदारांसह एनसीपीआयमध्ये सामील झाल्या आहेत.






























































