
कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाला दिवसेंदिवस तीव्र विरोध होत आहे. विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पापासून कोकण वाचवण्यासाठी ग्रामस्थ संघटित होऊ लागले आहेत. राजापूर तालुक्यातील धोपेश्वर ग्रामपंचायतीने आज बारसू येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात ग्रामसभेत ठराव करत प्रकल्पाच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
ग्रुप ग्रामपंचायत धोपेश्वर येथे आज ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मौजे बारसू,सोलगाव, वरचीवाडी, खालचीवाडी येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाचा विषय चर्चेला आला. उपस्थित सर्व ग्रामस्थांनी अणुउर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध केला. कोकणातील आंबा, काजू, मासेमारी, पर्यावरण आणि पर्यटन संरक्षणासाठी अणुऊर्जा प्रकल्प राबवू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. आजच्या ग्रामसभेत या ठरावाला पुरूषोत्तम खांबल हे सूचक व सहदेव सोगम हे अनुमोदन होते. सभेत ठराव मंजूर करण्यात आला.
संमतीशिवाय भू संपादन करू नका
आज झालेल्या ग्रामसभेचा निर्णय आणि स्थानिक ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून अणुउर्जा प्रकल्पाबाबत सरकारने फेरविचार करावा. ग्रामपंचायत हद्दीतील कोणत्याही जमिनीचे ग्रामस्थांच्या संमतीशिवाय संपादन करू नये अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.
अणुउर्जा प्रकल्पाच्या संदर्भात आम्हाला तहसीलदार कार्यालयातून पत्र आले होते. त्यापत्रावर आज ग्रामसभा घेऊन अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात ठराव केला. आम्हाला कोणताही विनाशकारी प्रकल्प नको. पर्यावरणपूरक प्रकल्प राबवा. – स्वप्नील सोगम, ग्रामस्थ धोपेश्वर






























































