
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची प्रकल्पीय क्षमता १०५.२५ टीएमसी असून, ७ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत धरणात ३५.७१ टीएमसी (३३.९३ टक्के) पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात ९३ हजार क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. जिल्ह्यात ७ जुलैअखेर एकूण २८८.७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, नदी, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत.
जिल्ह्यातील २२ महसूल मंडळांमध्ये ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला असून, महाबळेश्वर मंडळात सर्वाधिक म्हणजे ३९२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय लामज, बामणोली, तापोळा (१६९ मि.मी.), वाठार (१४८.५ मि.मी.), पाचगणी (१३६.५ मि.मी.) या भागांतही जोरदार पाऊस झाला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून महाबळेश्वर, जावली आणि वाई तालुक्यातील बाधित क्षेत्रातील एकूण ९० हून अधिक नागरिकांचे अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा आणि मंदिरांमध्ये सुरक्षित ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे.
पावसाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यात एकूण ८३ घरांची पडझड झाली असून, यामध्ये पाटण तालुक्यातील सर्वाधिक ३९ घरांचा समावेश आहे. या घरांच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच केरी येथील प्राथमिक शाळेचे पत्रे उडाले असून, मिरजे येथील प्राथमिक शाळा व स्मशानभूमीच्या भिंतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणांपैकी धोममध्ये ६.५९ टीएमसी (४८.८१%), धोम-बलकवडीत २.१७ टीएमसी (५३.१९%), कण्हेरमध्ये ६.२९ टीएमसी (६२.२८%), उरमोडीत ४.५० टीएमसी (४५.१८%) तर तारळी धरणात १.७३ टीएमसी (२९.५७%) पाणीसाठा झाला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धबधबे आणि पाणी साचणाऱ्या सखोल भागात पर्यटनावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
“पावसामुळे झाडे कोसळणे, दरड कोसळणे किंवा रस्ता खचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणांनी तात्काळ सजग राहून कार्यवाही करावी आणि रस्ते वाहतुकीसाठी तातडीने खुले करावेत. तसेच, धोकादायक व दरड प्रवण क्षेत्रांमधील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन, त्यांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे,” असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत.






























































