
कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी २१ वर्षीय रिक्षाचालकाचे अपहरण करून त्याच्यावर हल्ला केल्याची घटना गावदेवी मैदान परिसरात घडली आहे. चाकूचा धाक दाखवत बॅट, बांबूने या रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. हर्षद गायकवाड असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून विशाल साळवीसह त्याच्या साथीदारांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचाच राग मनात धरून आरोपी रोहन डावरे याने हर्षदच्या आईला दाखल केलेला गुन्हा मागे घ्या अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. याची तक्रार देण्यासाठी हर्षदची आई कोपरी पोलीस ठाण्यात गेली होती. त्यानंतर हर्षदला स्कुटीवर बसवून गावदेवी मैदान परिसरात नेले. त्यानंतर साथीदारांनी हर्षदवर हल्ला केला.
























































