
आभाळ फाटल्याने रायगडात अनेक ठिकाणी हाहाकार उडाला. मात्र या अस्मानी संकटात प्रशासनाबरोबरच शिवसैनिकांनीही जीवाची बाजी लावत पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. पेणच्या तरणखोप येथील हिमगौरी हॉटेलमध्ये अडकलेल्या ३५ जणांची आपत्कालीन टीमच्या खांद्याला खांदा लावून सुटका केली. त्याचबरोबर गडब, जिते, तामसी बंदर यांसह अनेक गावांत धाव घेऊन पुरात अडकलेल्या गावकऱ्यांना होडीच्या मदतीने सुरक्षितस्थळी आणण्यात आले. शिवसेनेच्या या सामाजिक बांधिलकीचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
तरणखोप येथील हिमगौरी हॉटेलच्या परिसरात राहणारे हॉटेलचे ३५ कर्मचारी रूममध्ये अडकले होते. याबाबत हॉटेल व्यवस्थापनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तात्काळ मदतकार्य सुरू केले. माजी शहरप्रमुख रवींद्रनाथ पाटील, कल्पेश ठाकूर, भूषण पाटील, दिनेश पाटील यांच्यासह शिवसैनिक या बचाव मोहिमेत सहभागी झाले होते. दरम्यान पूरग्रस्तांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी प्रसाद भोईर यांनी केली आहे.
होडीतून पूरग्रस्तांना बाहेर काढले
शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तालुक्यातील गडब, जिते, ठाकूरबेडी, घोडा बंदर, तामसी बंदर प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन गुडघाभर पाण्यातून पायपीट करून पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी आणण्यात आले.




























































