
व्हँकुव्हर, दि. 8 (वृत्तसंस्था) – तब्बल 72 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्वित्झर्लंडने फिफा वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. कोलंबियाविरुद्धचा अत्यंत चुरशीचा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा जिंकत स्विस संघाने इतिहास रचला. 1954 नंतर प्रथमच त्यांनी विश्वचषकाच्या अंतिम आठ संघांत स्थान मिळवले. तसेच एका विश्वचषकात सलग दोन बाद फेरीचे सामने जिंकण्याची किमयाही त्यांनी प्रथमच साधली. आता गतविजेत्या अर्जेंटिनाशी त्यांची रंगतदार लढत होणार आहे.
व्हँकुव्हर येथील बीसी पॅलेस स्टेडियमवर झालेल्या या लढतीत निर्धारित 90 मिनिटे तसेच प्रत्येकी 15 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही एकही गोल झाला नाही. त्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर लागला.
पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियाला दोन मोठे धक्के बसले. डेव्हिन्सन सांचेझ याचा फटका क्रॉसबारवर आदळला, तर कुचो हर्नांडेझ याचा पेनल्टी फटका स्वित्झर्लंडचा गोलरक्षक ग्रेगर कोबेल याने अप्रतिमरीत्या रोखला. त्यानंतर रुबेन वर्गास याने निर्णायक पेनल्टी गोलमध्ये रूपांतरित करत स्वित्झर्लंडच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
दोन्ही संघांनी दवडल्या सुवर्णसंधी
उत्तरार्धात लुईस सुआरेझला कोलंबियासाठी आघाडी मिळवून देण्याची सुवर्णसंधी मिळाली, मात्र त्याचा फटका लक्ष्यापासून दूर गेला. दुसरीकडे स्वित्झर्लंडच्या फॅबियन रिडर याचा जोरदार व्हॉली फटका कोलंबियाचा गोलरक्षक कॅमिलो वर्गास याने रोखला. अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांनी विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले. कोलंबियाच्या जॉन लुकुमी याचा हेडर क्रॉसबारला धडकला, तर स्वित्झर्लंडच्या बदली खेळाडू झेकी अमदौनी याचा फटका वर्गासने अडवला. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये स्वित्झर्लंडने बाजी मारत 72 वर्षांची प्रतीक्षा संपवली.


























































