
अरुणाचल प्रदेशात पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे लोहित जिल्ह्यात तेझूजवळील शिवाजी नगर भागात दरड कोसळली. यात दोन जण ठार झाले आणि चार जण जखमी झाले. सर्वजण स्थलांतरीत मजूर होते. दरड कोसळल्यानंतर पाच जण ढिगाऱ्याखाली अडकले होते, तर एक जण स्वतःहून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. बचाव पथकांनी दोन मृतदेह बाहेर काढले.
एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, सर्वजण याच परिसरातील एका बांधकाम प्रकल्पावर काम करणारे मजूर होते. घटनेची माहिती मिळताच लोहित जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव आणि मदतकार्य सुरू केले. अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आणि बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी ‘स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स’ (SDRF) आणि अरुणाचल प्रदेश पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.
दरम्यान, सततच्या पावसामुळे खोन्सा येथील पोस्ट ऑफिसजवळील खोन्सा-लाझू रस्त्याचा मोठा भाग खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे तिरप जिल्ह्यातील अनेक गावे आणि महत्त्वाच्या सरकारी आस्थापनांशी असलेला संपर्क तुटला आहे.

























































