
मुसळधार पावसामुळे विविध राज्यांमध्ये साथीच्या आजारांनी डोके वर काढले असतानाच आंध्र प्रदेशात कोरोना विषाणूची दहशत निर्माण झाली आहे. सहा वर्षांपूर्वी जगभर हाहाकार उडवलेल्या कोरोना विषाणूने आंध्र प्रदेशातील एका नागरिकाचा बळी घेतला आहे. या रुग्णावर मागील चार दिवसांपासून उपचार सुरू होते. त्या रुग्णाच्या मृत्यूसह दोन जिल्ह्यांत पाच सक्रिय रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली असून संपूर्ण राज्यभरातील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे चार दिवस उपचार घेतल्यानंतर एका 46 वर्षीय व्यक्तीचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. संबंधित व्यक्तीला तीव्र दम्याचा त्रास आणि सततच्या खोकल्यामुळे स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा वैद्यकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, त्या व्यक्तीला दारूचे व्यसन होते. मृत्यू झालेल्या व्यक्तीची दोन्ही फुफ्फुसे गंभीरपणे खराब झाली होती. त्यामुळे त्याला न्यूमोनिया झाला होता. याव्यतिरिक्त राज्यातील कडप्पा आणि तिरुपती जिल्ह्यामध्ये आणखी पाच पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण संचालकांनी विषाणू संसर्ग रोखण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. राज्यभरातील सरकारी रुग्णालयांकडून आयसोलेशन बेड, आयसीयू बेड, ऑक्सीजन, व्हेंटीलेटर, औषधे रॅपिड टेस्ट किट्स, रुग्णवाहिका आणि मनुष्यबळ आदींचा तपशील मागवला आहे.
कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची फुफ्फुसे निकामी झाली होती. रुग्णाला प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) ठेवण्यात आले होते. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. परिसराच्या निर्जंतुकीकरणालाही सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहितीही आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.



























































