Nanded News – २००७–०८ च्या हादर्‍यांची आठवण पुन्हा ताजी, आजच्या भूकंपाने नांदेडकरांमध्ये भीतीचे सावट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

२००७ ते २००८ या वर्षभरात नांदेडकरांना छोट्या मोठ्या ३९ भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू हा सायन्स कॉलेजवळील एका विहिरीत होता. वेगवेगळ्या तज्ञांनी नांदेडला भूकंपाचा धोका नाही, असे त्यावेळी सांगितले. तत्कालीन जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी हैद्राबाद आणि दिल्लीच्या वेगवेगळ्या टिम त्याठिकाणी बोलविल्या होत्या. २००८ साली नांदेड शहरात गुरुता गद्दीचा कार्यक्रम होणार असल्याने या भूकंपाच्या संदर्भात सर्व माहिती आणि येणार्‍या काळात त्याची संभाव्य शक्यता याचा सारासर विचार करुन तज्ञांनी अहवाल तयार केला होता. काहींच्या मते जमिनीतील हवा आणि पाणी यांचा पोकळी निर्माण झाल्याने भूगर्भातून असे आवाज येत आहेत, असा काही तज्ञांनी अंदाज मांडला. मात्र हैद्राबादच्या विशेष टिमने या सर्व भूकंपाच्या धक्क्याचा अभ्यास करुन हे भूकंपाचेच धक्क असल्याचे सांगितले होते. या भूकंपाच्या धक्क्यांनी श्रीनगर, वर्कशॉप, चैतन्यनगर, तरोडा, शिवाजीनगर, पावडेवाडी आदी भागातील लोकांनी रात्र जागून काढली होती. हे विशेष.

नोव्हेंबर २००६ पासून नांदेड शहर आणि परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के आणि जमिनीतून मोठे स्फोटासारखे आवाज येण्यास सुरुवात झाली. ३१ मार्च २००७ रोजी पहाटे झालेल्या धक्क्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर वर्षभर अधूनमधून धक्के जाणवत राहिले.

२००८ पर्यंत सुरूच राहिली भूकंपीय मालिका

२००७ ते २००८ या काळात नांदेडमध्ये शेकडो लहान भूकंपीय घटना नोंदवल्या गेल्या. या मालिकेत ५०० हून अधिक सौम्य भूकंप व कंपनांची नोंद झाल्याचे अभ्यासकांनी नमूद केले आहे. या घटनांमुळे अनेक नागरिकांनी काही दिवस घराबाहेर मुक्काम केला होता.

वैज्ञानिकांनी काय सांगितले?

भूगर्भशास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, नांदेड परिसरातील या घटना उत्तर-पश्चिम ते दक्षिण-पूर्व दिशेच्या भूगर्भीय फॉल्टशी संबंधित असू शकतात. नांदेड हा कमी भूकंपीय धोका असलेल्या विभागात असला तरी अशा भूकंपांच्या मालिके’ ची नोंद यापूर्वीही झाली आहे.

आजचा धक्का का महत्त्वाचा?

आजचे धक्के हे २००७–०८ च्या घटनांची आठवण करून देणारे आहेत. तज्ज्ञांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनानेही परिस्थितीवर लक्ष ठेवले असून सध्या कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र नागरिकांना पुन्हा २००७ आणि २००८ च्या भूकंपाची आठवण झाली.