Ratnagiri News – वीज संकटामुळे जनजीवन ठप्प, एसटीची ई-बस सेवाही बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालुक्यातील वीज संकट आता केवळ वीजपुरवठ्यापुरते मर्यादित राहिलेले नसून संपूर्ण तालुक्याच्या अर्थकारणावर, वाहतुकीवर आणि दैनंदिन जीवनावर त्याचे गंभीर परिणाम होताना दिसत आहेत. तब्बल ८२ तासांहून अधिक काळ दापोली शहरासह अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, उद्योजक आणि पर्यटक अक्षरशः वेठीस धरले गेले आहेत. “दापोलीची वाटचाल २१ व्या शतकाकडे अश्मयुगाकडे सुरू आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

दापोली हे कोकणातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. मात्र मोठे वादळ, ढगफुटी किंवा अतिवृष्टी नसतानाही अनेक दिवस वीजपुरवठा सुरळीत करता न येणे हे महावितरणच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे. मानवाने अवकाशात नवे विक्रम प्रस्थापित केले असताना दापोली तालुका मात्र ८० तासांहून अधिक काळ अंधारात राहून वेगळाच विक्रम करत असल्याची उपरोधिक चर्चा सर्वत्र सुरू आहे. या वीज संकटाचा सर्वाधिक फटका दापोली आगारालाही बसला आहे. सध्या आगारात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक (चार्जिंग) एसटी बसेस कार्यरत आहेत. मात्र वीजपुरवठाच खंडित असल्याने या बसेस चार्ज होऊ शकत नसल्यामुळे त्या आगारातच उभ्या राहिल्या आहेत. परिणामी अनेक नियोजित फेऱ्या रद्द कराव्या लागल्या असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि नोकरीसाठी प्रवास करणाऱ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही या वीज संकटाचा मोठा फटका बसला आहे.

दुसरीकडे लघुउद्योग, हॉटेल व्यवसाय, दुकाने, इंटरनेट सेवा, बँकिंग व्यवहार आणि पर्यटनाशी संबंधित अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. व्यापाऱ्यांचा लाखो रुपयांचा व्यवसाय बुडाला असून नाशवंत वस्तू खराब झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई महावितरण देणार का, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या अनेक युवकांचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. इंटरनेट आणि संगणक सुविधा बंद पडल्याने रोजगारावरही परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अभ्यासावरही विपरीत परिणाम होत आहे.

दरम्यान, पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनाची तयारी नेमकी झाली होती का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. वीजवाहिन्यांची देखभाल, झाडांची छाटणी, पर्यायी व्यवस्था आणि आवश्यक मनुष्यबळ यांचे नियोजन अपुरे पडल्याचे चित्र या संकटातून समोर येत असल्याचे बोलले जात आहे. महावितरणमध्ये सक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वानवा आहे का, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दापोली महावितरणच्या दोन प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने आधीच अस्तित्वात असलेल्या समस्यांमध्ये अधिक भर पडल्याची चर्चा आहे. या बदल्यांचा दुरुस्तीच्या कामांवर परिणाम झाला का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

वीज, रस्ता आणि पाणी या नागरिकांच्या मूलभूत गरजा वेळेत उपलब्ध करून देण्यात शासन आणि प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र झाली आहे. त्यामुळे जून आणि जुलै महिन्यांचे वीजबिल माफ करावे, दोन महिन्यांचा स्थिर आकार रद्द करावा तसेच व्यावसायिक ग्राहकांना घरगुती दराने वीजबिल आकारावे, अशी मागणी पुढे आली आहे. पर्यटनाची ओळख असलेल्या दापोलीत अंधाराचे हे संकट केवळ वीजपुरते मर्यादित नसून विकासाच्या दाव्यांनाच प्रश्न विचारणारे ठरत आहे. आता तरी महावितरण आणि प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना करणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.