>> सोहम पिंगळीकर ([email protected])
मिथुन चक्रवर्ती हा असा अभिनेता ज्यांची प्रत्येक फिल्म कल्ट आहे असे नाही. उलट वेगवेगळ्या सिनेमांचे तुकडे, अनेक प्रेक्षकांच्या आठवणी आणि वेगवेगळ्या थाटातले त्यांचे अवतार एकत्र येऊन ‘प्रभूजी’ नावाची न संपणारी कल्ट प्रतिमा तयार झाली आहे.
आपण सिनेमा का बघतो? कधी कथेसाठी, कधी गाण्यांसाठी, तर कधी स्टारसाठी. शाहरुख, अमिताभ, रजनीकांत यांचा कोणताही सिनेमा पाहिला तरी त्यात ते स्टार म्हणून आपल्या प्रतिमेला अनुसरून वागत असतात, पण प्रभूजींनी आपल्या भक्तांना इतक्या विविध रूपांत दर्शन दिले आहे की, या एका लेखात त्याचा आढावा घेणे अवघड आहे. 50 वर्षांच्या कारकीर्दीत सहा भाषांमध्ये मिळून किमान 350 हून अधिक सिनेमे करणारा हा महापुरुष म्हणजे मिथुन चक्रवर्ती ऊर्फ डिस्को डान्सर जिमी ऊर्फ प्रभूजी.
मिथुनने पहिला सिनेमा केला ‘मृगया’ आणि त्यात केलेल्या आदिवासीच्या भूमिकेसाठी थेट नॅशनल अवॉर्ड मिळवला. आता असं काही घडल्यावर इतर अभिनेते स्वतला आर्टहाऊस सिनेमाशी बांधून घेतील, पण प्रभूजी अवतारी पुरुष आहेत. त्यांनी एकाच आयुष्यात डिस्को डान्सर, आंतरराष्ट्रीय गुप्तहेर, दलाल, एअरपोर्टवरचा हमाल, एम. ए. नारळवाला आणि अगदी रामकृष्ण परमहंसांचाही अवतार घेतला. या अवतारांत ते हाताने गोळी पकडून उलट फेकून मारू शकतात किंवा माकडाकडून कराटेसुद्धा शिकू शकतात. एकदा समोरची काच बुलेटप्रूफ असल्याचं कळल्यावर प्रभूजींनी जमावाला दगड मारायला सांगितले. कारण काच बुलेटप्रूफ होती, पत्थरप्रूफ नव्हती. दगडांचा मारा झाला आणि काच खळकन फुटली.
आता अशक्य ते शक्य करणाऱया या दिव्यात्म्याला केवळ अभिनेता म्हणणे अशक्य आहे, म्हणून त्यांना प्रभूजी असे नाव मिळाले. त्यांचे चाहते नाही, तर भक्त तयार झाले. या भक्तांना कोणत्या सिनेमात प्रभूजींचा काय रोल होता, याच्याशी कर्तव्य नसते. काळाच्या ओघात चित्रपट विसरले, भूमिका विसरल्या तरी चमत्कार उरतात आणि सगळे चमत्कार शेवटी एकाच नावावर जमा होतात – प्रभूजी. ही काही मिथुनने केलेली भूमिका नाही, तर ती सर्वस्वी प्रेक्षकांची निर्मिती आहे. प्रेक्षकांनी जिमी, गनमास्टर जी-9, शेरा, लीलाधर महाराज अशा सगळ्या भूमिका पाहिल्या आणि त्यांचे एकत्र कोलाज करून एक अखंड ‘पुरुषोत्तम’ तयार केला आहे. आता इथे एक गफलत होऊ शकते. सुपरस्टारचेही चाहते असतात, ते त्याची नक्कल करतात, त्याची स्टाईल उचलतात, क्वचित दुधाने अभिषेकही करतात. मग त्यांच्यापेक्षा प्रभूजी वेगळे कसे?
एखादा अभिनेता जेव्हा स्टार होतो, तेव्हा त्याची प्रतिमा निश्चित होत जाते. कथा काहीही असली तरी शाहरुखचे हात पसरणे, सलमानचे शर्ट फाडणे अशा कृतींमधून ही प्रतिमा आणखी ठोस होत जाते. एखाद्या सिनेमात स्टारने आपल्या ठरावीक प्रतिमेपेक्षा वेगळे काही केले की, त्याच्या चाहत्यांना ते मान्य होत नाही. उदा. ‘टय़ूबलाईट’मध्ये सलमानने मतिमंद व्यक्तीची भूमिका केली आणि प्रेक्षकांना तो सलमान वाटलाच नाही. प्रभूजींच्या प्रतिमेला अशा मर्यादा नाहीत. तहादेर कथामधला स्वातंत्र्यवीर, चिंगारीमधला ठरकी भोंदूबाबा – अशा कोणत्याही भूमिकेत त्यांची लीला अगाध असते. त्यांनी तीन नॅशनल अवॉर्ड मिळवले. मृणाल सेन, मणी रत्नमसोबत काम केले आणि दुसरीकडे बी-ग्रेडमध्ये कांती शाहसोबत ‘गुंडा’, ‘लोहा’ या फिल्मसुद्धा केल्या. सामान्य स्टारच्या बाबतीत याला ‘इमेज प्रॉब्लेम’ म्हटलं गेलं असतं. प्रभूजींच्या बाबतीत त्याला कारकीर्द म्हणतात.
नव्वदच्या दशकात नवे चेहरे आल्याने त्यांचे हिंदी सिनेमे फारशी कमाई करत नव्हते, पण त्यामुळे खचणार ते प्रभू कसले! त्यांनी उटी या छोट्या शहरात आपली दोन हॉटेल्स उघडली आणि प्रतिचित्रपटसृष्टीच निर्माण केली. सिनेमाचे पूर्ण शूटिंग उटीमध्ये. सगळे युनिट राहणार त्यांच्या हॉटेलमध्ये. सलग तारखा. कमी बजेटमध्ये वेगवान निर्मिती. या काळात बी आणि सी ग्रेडच्या प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून प्रभूजी एकाच वेळी कितीतरी सिनेमांवर काम करायचे. ते चित्रपट स्वीकारतानाच सिनेमा पूर्ण होण्याची तारीख द्यायचे, मग नायिका बदलो नाहीतर कथा बदलो. या कारखान्यातून वर्षाकाठी ढिगाने नवे चमत्कार आणि संवाद त्यांच्या नावावर जमा होत होते. 1989 या एकाच वर्षात 19 सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका करण्याचा विश्वविक्रम आजही त्यांच्या नावावर आहे.
या सगळ्या ‘वाईट’ सिनेमांमुळे त्यांच्या स्टार प्रतिमेला धक्का बसला, पण यातूनच त्यांची कल्ट प्रतिमा तयार झाली. त्यांच्या सिनेमांमध्ये कितीही अशक्य गोष्टी घडल्या तरी प्रभूजी स्वत निष्ठेने आपले काम करत राहिले. प्रेक्षक त्यांच्यावर हसतो की त्यांचे कौतुक करतो, याची त्यांना तमा नव्हती. हसता हसता शेकडो लोक त्यांचे भक्त झाले तरी त्या निर्मोही जिवाला त्याची तमा नव्हती. ते आपल्या लीला दाखवण्यात मग्न राहिले आणि या भक्तीचा पुरावा हवा असेल तर ‘ओम शांती ओम’च्या सेटवरचा एक प्रसंग पुरेसा आहे. फराह खानने ‘दिवानगी दिवानगी’ या गाण्यात अर्धे बॉलीवूड गोळा केले होते, पण ज्या दिवशी मिथुन सेटवर आले, त्या दिवशी त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी लाईटमन आणि स्पॉटबॉय यांच्यात अक्षरश चेंगराचेंगरी झाली. बरं, त्यांचा हा महिमा काही फक्त भारतापुरता मर्यादित नाही. डिस्को डान्सर हा सिनेमा रशियामध्ये रिलीज झाला आणि त्या काळातला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला.
भारतातल्या श्रमजीवी वर्गाचा नायक सोव्हिएत संघात भारताचे झगमगते प्रतीक म्हणून ओळखला जाऊ लागला. ‘जिमी जिमी आजा आजा’ या गाण्याला राष्ट्रगीताचे महत्त्व प्राप्त झाले. आजही गोरे लोक हे गाणे गातानाचे शेकडो व्हिडीओ सापडतात. भारताने मिथुन चक्रवर्ती दिला, रशियाने त्याचा जिमी बनवला आणि इंटरनेटने प्रभूजी. शाहरुख कुठेही गेला तरी शाहरुख असतो, पण प्रभूजींची महती अशी की, देशागणिक त्यांची प्रतिमा बदलत जाते. प्रत्येक यश, अपयश, वाईट चित्रपट, चुकीची आठवण आणि नवा प्रेक्षक यांमधून त्यांच्या पुराणात आणखी एक अध्याय जोडला जातो.
मागच्या लेखात आपण पाहिले की, कथेपलीकडे फक्त तुकडय़ांमुळेही सिनेमे कल्ट होतात, पण मिथुन आहेत म्हणून त्यांची प्रत्येक फिल्म कल्ट आहे असे नाही. उलट वेगवेगळ्या सिनेमांचे तुकडे, अनेक प्रेक्षकांच्या आठवणी आणि वेगवेगळ्या थाटातले त्यांचे अवतार एकत्र येऊन ‘प्रभूजी’ नावाची न संपणारी कल्ट प्रतिमा तयार झाली आहे. आजही रिअॅलिटी शोपासून रीलपर्यंत प्रभूजी भक्तांना दर्शन देत राहतात, त्यांची प्रतिमा बदलत राहते, आख्यायिका घडत जाते आणि या प्रभूपुराणाला आळा घालणे स्वत मिथुनलासुद्धा शक्य नाही. कोई शक…?



























































