
आज विरोधी पक्षांकडून देशाच्या निवडणूक आयोगावर अविश्वास व्यक्त करण्यात येत असताना आयोगाच्या प्रतिष्ठेसाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अतिशय गंभीर होते. काही केंद्रीय मंत्र्यांनी निवडणूक आयोगाबाबत टीप्पण्या केल्या होत्या. त्याची तक्रार केल्यानंतर मनमोहन सिंग म्हणाले होते, हे खरे असेल तर मी आत्महत्या करीन. हा किस्सा माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी त्यांच्या ‘इंडिया अँड आय-अ हंड्रेड मेमोरीज, नॉट अ मेमॉयर’ या पुस्तकात लिहिला आहे.
कुरेशी हे वर्ष 2010 ते 2012 या कालावधीत देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी वर्ष 2012 मधील हा किस्सा लिहिला आहे. त्यात त्यांनी सांगितले, की त्यावेळी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात आयोगाच्या विरोधात काही मंत्र्यांनी टीप्पण्या केल्या होत्या. काँग्रेसच्या नेत्यांनी आयोगाला अहंकारी आणि मनमानी म्हटले होते. याची तक्रार मनमोहन सिंग यांना केली असता ते म्हणाले, की तुम्हाला असे वाटत असेल तर मी आत्महत्या करीन. पंतप्रधानांच्या तोंडातून हे वाक्य ऐकताच कुरेशी चकित झाले होते.
निवडणूक आयोग लोकशाहीचा आत्मा
मनमोहन सिंग यांनी कुरेशी यांना त्यावेळी सांगितले होते, की निवडणूक आयोग हा केवळ हिंदुस्थानचा गौरव नाही, तर लोकशाहीचा आत्मा आहे. आम्ही त्यास गमावले तर आपण सर्वकाही गमावून बसू.




























































