शूsss बोलू नका! महाराष्ट्र बदनाम होईल! मुंबईच्या वेशीवर आदिवासी गर्भवतीची झोळीतून फरफट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या वेशीवर असलेल्या खालापूर तालुक्यातील उंबरणे या आदिवासी वाडीतील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी झोळीत घालून पाच किलोमीटरची पायपीट करावी लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उंबरणे वाडी ही शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या खालापूर तालुक्यात तर भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या उरण मतदारसंघात आहे. दगडवाटा, काटेकुटे तुडवत नातेवाईकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या महिलेला चौकच्या आरोग्य केंद्रात दाखल केले. हे भोग ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिलांना गावागावात भोगावे लागत आहेत. पण यावर बोलले तर महाराष्ट्र बदनाम होईल. त्यामुळे शूsss बोलू नका!

 खालापूर तालुक्यातील लोधिवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये उंबरणेवाडी, आरकसवाडी, पीरकरवाडी ही छोटी गावे आहेत. मात्र या गावांना अजूनही रस्ता नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. उंबरणेवाडीत राहणाया मनिषा पारधी या गर्भवती महिलेला शनिवारी प्रसूतीकळा सुरू झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र कोणतीच व्यवस्था नसल्याने तिला झोळीत घालून नातेवाईकांनी ग्रामस्थांच्या मदतीने चार किमी चालत जाऊन कसेबसे चौक येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. मनिषाला प्रचंड वेदना होत असतानाही दगडगोटे, चिखल, विंचू-सापाची भीती अशा अनेक संकटांचा सामना करीत दवाखान्यात आणले. दैव बलवत्तर म्हणून तिची सुखरुप प्रसूती झाली व तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

‘हा यांचा विकास’! रोहित पवारांची पोस्ट व्हायरल

खालापूरच्या या घटनेचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी शिंदे गट व भाजपवर उपरोधिक टीका केली आहे. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कथित विकासासाठी शिवसेनेतून फुटून भाजपसोबत गेलेल्या खालापूरच्या लोकप्रतिनिधींचा गोव्यातील हॉटेलमध्ये टेबलवर उभं राहून नाचतानाचा व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल. त्यांच्याच खालापूर मतदारसंघातील हा ‘विकास’ बघा. रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला उपचारासाठी झोळीतून खांद्यावरून नेण्याची वेळ आली. हा यांचा ‘विकास’. शिवाय राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यासुद्धा रायगड जिह्यातील आहेत आणि त्यांच्या जिह्यातच महिलांची ही अवस्था असेल तर इतर जिह्यांबाबत न बोललेलंच बरं!

बालदी यांच्या आश्वासनांचे काय झाले?

हा भाग भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या उरण विधानसभा मतदार क्षेत्रात येतो. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर बालदी यांनी उंबरणेवाडीवासीयांना रस्ता बांधून देऊ असे आश्वासन दिले होते. पण या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.