
बुलढाण्याच्या नांदुरा येथे पूर्णा नदीत पाय घसरून दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे नांदुरात हळहळ व्यक्त होत आहे. कृष्णा भोपळे (14) व प्रतिक वानखेडे (12) अशी मृत मुलांची नावे आहेत.रविवार असल्याने दोन्ही मुले पूर्णा नदी परिसरात फिरायला गेली होती. त्यानंतर नदीकाठी पाय घसरल्याने दोघे पाण्यात बुडाले. ही घटना लक्षात येताच ओम साई फाऊंडेशनच्या जलमित्र पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या बचाव मोहिमेत गोपाल फंड, उमेश पाखरे, विकास पाखरे, प्रद्युम्न पाखरे, राजू पाखरे, विलास निंबोळकर, राहुल निमकडे आणि कृष्णा वसोकार यांनी तत्परतेने सहभाग घेतला. दोन्ही मुलांना तातडीने नांदुरा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेमुळे मृत मुलांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.




























































