
राज्यात बोगस बियाणे, बोगस पदव्या, बोगस नोकऱ्या, पेपरफुटी आणि विविध घोटाळ्यांनी व्यवस्था पोखरली आहे. बोगस बियाण्यांच्या रॅकेटलाही सत्ताधाऱ्यांचे संरक्षण आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणी कृषी विभागाने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे बहुजन कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यानंतर सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावरून महायुती सरकारवर टीका केली. सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच बोगस बियाण्यांचे रॅकेट सुरू असून या प्रकरणी चौकशीसाठी नेमलेली समितीही निष्क्रिय ठरली आहे, त्या समितीने कोणतीही प्रभावी कारवाई केलेली नाही, असा आरोप सपकाळ यांनी केला. कृषी विभागाने राज्यव्यापी धडक मोहीम राबवून यातील दोषींवर कारवाई करावी, असे सपकाळ म्हणाले. काँग्रेस या सर्व प्रश्नांवर राज्यभर आक्रमकपणे आंदोलन करत असून विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. मात्र आता लोकशाही, संविधान, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी जनतेनेही मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची वेळ आली असल्याचे सपकाळ म्हणाले.




























































