मुक्ताई निघाल्या ही… पाऊस मात्र आला नाही, वर्षानुवर्षाची परंपरा खंडीत झाल्याने बळीराजा अस्वस्थ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीडकरांच्या भावविश्वात अनेक दशकापासून जपली गेलेली एक हळवी भावना आहे. संत मुक्ताबाईची पालखी बीड शहरात दाखल होताच आभाळ दाटून येते. मुक्ताबाई बीडमध्ये येतानाच पावसाच्या सरी घेवून येतात. या अनुभवाने अनेक पिढ्यांच्या मनात एक वेगळे नाते निर्माण केले आहे. मात्र निसर्गामध्ये होत असलेला बदल ही परंपरा खंडीत करत आहे. यंदा मुक्ताबाई आल्या, दोन दिवस बीड वासियांची सेवाही घेतली. पंढरपूरकडे कूच करण्यासाठी पालखीची लगबगही सुरू आहे. पाऊस मात्र अद्याप आला नाही. वर्षानुवर्षाची ही परंपरा यंदा खंडीत झाल्याने शेतकरी मात्र अस्वस्थ आहे.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही संत मुक्ताबाईची पालखी मोठ्या दिमाखात आणि भक्तीभावाने बीडमध्ये दाखल झाली. बीडवासियांनी अभूतपूर्व स्वागत केले. उत्साह शिगेला पोहोचला. दोन दिवस हरिनामाचा गजर बीडमध्ये कानाकोपर्‍यात पोहोचला. या हरिनामाच्या गजरातच मुक्काम झाला. एक दिवस माळीवेसच्या हनुमान मंदिरात तर दुसर्‍या दिवशी पेठ बीडमधील बालाजी मंदिरात मुक्ताबाई विसावल्या. आज सोमवारी पहाटेच बिंदुसरा तिरावरील आजोबा श्रीधर पंताच्या समाधीचे दर्शन घेवून मुक्ताबाई आपल्या पालखीसह पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. मात्र यावेळी बीडकरांच्या मनात एकच सल राहिली. पालखी येवून गेली पण पावसाचा एकही थेंब बसरला नाही. पावसाच्या स्वागतातच मुक्ताबाईंचे बीडमध्ये आगमन होत असते. ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे. या परंपरेत बीडवासियांच्या मनात एक वेगळे नाते निर्माण झाले आहे. पाऊस आता नाही पडला तरी मुक्ताबाई पाऊस घेवून येईल. हा दृढ विश्वास बीडवासियांच्या मनात वर्षानुवर्षे रूजल्या गेल्या आहे आणि तो विश्वास आतापर्यंत सार्थ ठरला. मात्र अलिकडच्या काळात हवामानातील बदल, पावसाची अनियमितता, वाढलेले तापमान, ढासळलेले पर्यावरण, निसर्गाचा असमतोल यामुळे मुक्ताबाई बीडमध्ये आल्या आणि निघाल्याही. पाऊस मात्र गायब आहे. वारकरी आणि शेतकर्‍यांमध्येही हा हळवा समज घर करून आहे. नजरा आभाळाकडे लागल्या असल्या तरी मुक्ताबाईंच्या कृपेने अजूनही पाऊस येईल हा विश्वास आहे.