नाथवंशजांना बैलगाडीतून घाट पार घालत जपली शतकांची परंपरा, हटकरवाडीतील तरुणांनी दाखवले श्रध्येचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वारकरी संप्रदायातील सेवा, समर्पण आणि श्रद्धेचे अनोखे दर्शन सोमवारी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हटकरवाडी येथे घडले. संत एकनाथ महाराजांच्या पालखीसोबत आलेल्या नाथवंशजांना सजवलेल्या बैलगाडीत बसवून सुमारे तीन किलोमीटरचा गारमाथा घाट स्वतःच्या श्रमाने ओढत डोंगरापलीकडे नेण्याची शेकडो वर्षांची परंपरा हटकरवाडीच्या ग्रामस्थांनी यंदाही भक्तिभावाने जपली.

संत एकनाथ महाराजांची पालखी ७ जुलै रोजी पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान करून सात मुक्काम पूर्ण करत सोमवारी सकाळी हटकरवाडी येथे पोहोचली. येथून पालखीचा पुढील मुक्काम पाटोदा येथे असल्याने गारमाथ्याचा दगड-धोंड्यांनी भरलेला कठीण घाटमार्ग पार करावा लागतो. या खडतर प्रवासात वारकरी पायी मार्गक्रमण करतात, तर पालखी सोहळ्याचे प्रमुख नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले आणि योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांना गावकऱ्यांकडून विशेष सन्मान दिला जातो.

हटकरवाडीतील ग्रामस्थ वारकऱ्यांचा प्रेमाने पाहुणचार करून नाथवंशजांना फुलांनी सजवलेल्या बैलगाडीत विराजमान करतात. त्यानंतर गावातील तरुण स्वतः बैलगाडीला जुंपून ती सुमारे तीन किलोमीटर अंतर डोंगरमाथ्यापर्यंत ओढतात. या आगळ्यावेगळ्या परंपरेचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

या परंपरेमागील श्रद्धा अधिक विलक्षण आहे. बैलगाडी ओढणारे तरुण त्या दिवशी उपवास करतात. नाथवंशजांना गारमाथ्यावर सुखरूप पोहोचवल्यानंतर त्यांच्या हस्ते मिळणारा भाकरीचा प्रसाद ग्रहण करूनच ते उपवास सोडतात. सेवा हीच भक्ती मानणाऱ्या हटकरवाडीकरांनी शेकडो वर्षांपासून अखंड जपलेली ही परंपरा वारकरी संप्रदायाच्या संस्कारांचे आणि ग्रामीण संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे प्रेरणादायी प्रतीक ठरत आहे.