
घरात अवघ्या एक महिन्याच्या चिमुरडीच्या बारशाची जंगी तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे एका मातेने आपल्या पोटच्या गोळ्याला पाळण्यात ठेवून गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अस्मिता प्रतीकसिंह काटकर (वय २३, रा. काटकर मळा, सायबर चौक, कोल्हापूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. रविवारी सायंकाळी ही खळबळजनक घटना उघडकीस आली.
सुनेला डान्स येत नाही, पहिली मुलगीच झाली, तसेच माहेरून पैसे आणि दागिने आणत नाही, या कारणांवरून झालेल्या अतोनात छळाला कंटाळूनच अस्मिताने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती प्रतीकसिंह वीरेंद्रसिंह काटकर (वय ३०), सासू मनीषा (वय ५१), सासरा वीरेंद्रसिंह (वय ५८) आणि नणंद ऋतुजा (वय २५) या चौघांना अटक केली आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पोलिस आणि मृत अस्मिताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आजरा तालुक्यातील लाटगाव येथील अस्मिता अनिल सरदेसाई हिचा विवाह जानेवारी २०२५ मध्ये कोल्हापुरातील प्रतीकसिंह काटकर याच्याशी झाला होता. महिनाभरापूर्वीच अस्मिताने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. लग्नात डान्स केला नाही, माहेरून पाच तोळे सोन्याचे दागिने आणि ५ लाख रुपये आणले नाहीत, म्हणून पतीसह सासरच्या मंडळींकडून अस्मिताचा सतत मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. त्यातच पहिली मुलगी झाल्याने सासरच्यांकडून तिला सतत टोमणे मारले जात होते. येत्या १५ जुलै रोजी मुलीच्या बारशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी पती आणि सासरचे इतर लोक हॉल पाहण्यासाठी गेले होते. घरात बारशाची लगबग सुरू असतानाच, रविवारी सायंकाळी अस्मिताने आपल्या एक महिन्याच्या मुलीला पाळण्यात झोपवलं आणि घरातील छताच्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.
अस्मिताच्या सासरच्या लोकांनी आतापर्यंत तिच्याकडून ऑनलाईन आणि रोख स्वरूपात एकूण ५ लाख ७ हजार रुपये उकळले होते. तरीही त्यांची पैशांची आणि दागिन्यांची हाव संपली नव्हती. “आमच्या मुलीचा सासरच्यांनी मानसिक छळ करून खूनच केला आहे,” असा थेट आरोप अस्मिताची आई संगीता अजित सरदेसाई यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरूनच राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरची आर्थिक स्थिती उत्तम असतानाही केवळ पैशांसाठी आणि मुलगी झाल्याच्या कारणावरून सुनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या या घटनेने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची पुरोगामी नगरी हादरून गेली आहे.
मुलीच्या बारशासाठी सासरच्यांनी ५२ हजार रुपयांचा पाळणा ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि या सर्व कार्यक्रमाचा खर्च अस्मिताच्या माहेरच्यांनीच करावा, यासाठी तगादा लावला होता. “माझे शुक्रवारी मुलीशी शेवटचे बोलणे झाले होते. तिने बारसे दणक्यात साजरी करण्याचे सांगितले होते. पण आधीच दवाखान्याचा आणि अधिक मासाचा प्रचंड खर्च झाल्याने आम्ही हताश होतो,” असे सांगताना अस्मिताच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, अस्मिताच्या गळ्यावर जखमा आढळल्या असून, पोलिसांनी व्हिसेरा सुरक्षित (राखीव) ठेवला आहे. अस्मिताने नेमकी आत्महत्या केली की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा सखोल तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत.


























































