
हिमाचल प्रदेशातील बटाटा उत्पादकांसाठी खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट (CPRI)ने ‘लेट ब्लाइट’ (करपा) रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सध्याची हवामान परिस्थिती या रोगाच्या प्रसारासाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
CPRI च्या ‘इंडो-ब्लाइटकास्ट’ या रोगाचा अंदाज वर्तवणाऱ्या प्रणालीने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांत करप्या रोगांचा धोका हा सर्वाधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बटाटा हे हिमाचल प्रदेशातील महत्त्वाचे नगदी पीक असून, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी खबरदारी घेण्याचे CPRI ने म्हटले आहे.
संस्थेच्या वनस्पती संरक्षण विभागाचे प्रमुख डॉ. संजीव शर्मा यांनी सोमवारी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देत वेळेत प्रतिबंधात्मक फवारणी आणि पिकांची नियमित पाहणी करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मते, सुरुवातीच्या टप्प्यात योग्य उपाययोजना केल्यास रोगाचा प्रसार रोखता येऊ शकतो आणि उत्पादनातील नुकसान टाळता येईल. असे वृत्त पीटीआय ने दिले आहे.
तज्ञांच्या मते, बुरशीनाशक फवारणी साधारणपणे 10 दिवसांच्या अंतराने पुन्हा केली जाऊ शकते. तथापि, रोगाच्या तीव्रतेनुसार हे अंतर समायोजित केले जाऊ शकते. तसेच, एकाच बुरशीनाशकाचा वारंवार वापर टाळावा. प्रत्येक फवारणीसाठी 0.1 टक्के स्टिकर (अंदाजे 1 मिली प्रति लिटर पाण्यात) वापरावे. संस्थेने शेतकऱ्यांना शेतात पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था ठेवावी आणि तण नियंत्रणाकडे विशेष लक्ष द्यावे, जेणेकरून रोगाचा प्रसार रोखता येईल, असा सल्ला दिला आहे.





























































