मुद्दा – वसई-विरार पाण्याखाली का गेले?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अनिल दत्तात्रेय साखरे<<

वसईविरारला  पुराचा वेढा, जनजीवन ठप्प, पावसाच्या विश्रांतीनंतरही वसई-विरार जलमय  अशा बातम्या वाचल्या की, मन नकळत विषण्ण होते. वर्तमानातील जलमय वसई-विरार डोळ्यांसमोर उभे राहते आणि मन क्षणातच 80-90 च्या दशकातील त्या निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न वसईच्या अंगणात जाऊन विसावते. त्या काळातील वसई-विरार हा निसर्गाच्या कुशीत वसलेला, हिरवाईने नटलेला आणि पारंपरिक जीवनपद्धती जपणारा प्रदेश होता. पन्नास-साठ घरांची छोटी गावे, मुंबईत नोकरी-धंदा करून संध्याकाळी आपल्या गावाकडे परतणारी माणसे, गावाभोवतीची सुपीक शेती, तलाव, खाडय़ा, नारळी-पोफळीच्या बागा, ताजी भाजी आणि मासळीवर आधारलेली स्थानिक अर्थव्यवस्था हे येथील वैशिष्टय़ होते.

देवतलावाला पेंद्र मानून विरारकडील सोळा गावे आणि नायगावकडील बारा गावे अशी पारंपरिक विभागणी होती. सुख-दुःखात एकमेकांच्या घरी धाव घेणारे, सण-उत्सव एकत्र साजरे करणारे, घरात केलेला पदार्थ शेजाऱ्यांना प्रेमाने वाटणारे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिस्ती समाजातील लोक हीच वसईची खरी सांस्कृतिक श्रीमंती होती.

वसईच्या पूर्वेला वज्रेश्वरी देवीचे पवित्र देवस्थान, विरारची सुप्रसिद्ध जीवदानी माता, शहरभर पसरलेली प्राचीन मंदिरे, भव्य ख्रिस्ती चर्च आणि पश्चिमेला अथांग अरबी समुद्रकिनारा या सर्वांनी वसई-विरारला निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम लाभला होता. मराठय़ांचे पराक्रमी सरदार चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकून स्वराज्यात सामील केलेला ऐतिहासिक वसई किल्ला आजही त्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभा आहे. एकेकाळी प्रदूषणाने ग्रासलेल्या मुंबईला स्वच्छ हवा आणि ऑक्सिजन पुरवणारा हरित पट्टा म्हणून वसई-विरारकडे पर्यावरणतज्ञ आशेने पाहत होते व वसई-विरारमधील हिरवळ राखली पाहिजे असे तज्ञांचे म्हणणे होते.

मात्र नव्वदच्या दशकानंतर परिस्थिती झपाटय़ाने बदलू लागली. वसईच्या पूर्व पट्टय़ात औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या. मुंबईतील वाढत्या घरांच्या किमतींमुळे हजारो कुटुंबांनी वसई-विरारकडे मोर्चा वळवला. वाढत्या मागणीमुळे उंच निवासी इमारती, व्यापारी संकुले आणि नवीन वसाहती मोठय़ा प्रमाणावर उभ्या राहिल्या. विकासाचा वेग वाढला, परंतु त्याला सुसंगत असे रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण संरक्षणाचे नियोजन झाले नाही.

त्या काळात हरित वसई संरक्षण समितीने वसईची हिरवाई, शेती, तलाव आणि खाडय़ा वाचविण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारले. अनेक तज्ञांनी आणि पर्यावरणप्रेमींनी भविष्यातील संकटाची वेळोवेळी जाणीव करून दिली. तरीही तलाव बुजवले गेले, शेती नष्ट झाली, मोकळ्या जागांवर आणि खाडय़ांवर अतिक्रमणे झाली, नैसर्गिक जलमार्ग बंद झाले व काँक्रीटच्या जंगलाने निसर्गाची जागा घेतली.

त्याचे परिणाम आज सर्वांच्या डोळ्यांसमोर आहेत. पूर्वी मुसळधार पाऊस पडूनही कधीही पूर न पाहिलेला वसई-विरार परिसर आज एक-दोन दिवसांच्या पावसातही जलमय होतो. जनजीवन ठप्प होते, वाहतूक विस्कळीत होते, वीजपुरवठा खंडित होतो आणि हजारो नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. वसई-विरार पुराने वेढले अशा बातम्या वाचल्या की, मन पुन्हा एकदा अस्वस्थ होते आणि मग नकळत माझे मन लहानपणीच्या त्या सुंदर वसईच्या अंगणात जाऊन विसावते. निळेशार आकाश, डोलणारी हिरवीगार झाडे, स्वच्छ तलावात मित्रांसोबत मनसोक्त डुंबण्याचे दिवस, मातीचा दरवळ आणि निसर्गाच्या सान्निध्यातले ते निरागस आयुष्य. त्या आठवणी आजही मनाला दिलासा देतात, पण त्याच वेळी एक हळवी जाणीव करून देतात विकास आवश्यक आहे, पण तो निसर्गाच्या किमतीवर नव्हे, तर निसर्गाशी सुसंगत, सहयोग करून पर्यावरणपूरक आणि दूरदृष्टी ठेवून झाला तरच शहरांचे भविष्य सुरक्षित राहील.