
इराण युद्धाचा पुन्हा भडका उडल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणने यूएईच्या दोन तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यात एका हिंदुस्थानी खलशाचा मृत्यू झाला तर आठजण जखमी झाले. या घटनेनंतर हिंदुस्थानने नाराजी व्यक्त करत इराणचे उपराजदूत मोहम्मद जवाद हुसैनी यांना बोलावून हल्ल्यांसंदर्भात उत्तर मागितले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी जाहीर केल्यानंतर इराणवर हल्ले सरू केले. यावेळी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये तीव्र संघर्ष पेटलेला आहे. दोन दिवसांपूर्वी इराणने ओमानच्या किनाऱ्याजवळ सायप्रसच्या मालवाहू जहाजावर हल्ला केला होता. त्यातील 11 हिंदुस्थानी खलाशी थोडक्यात बचावले होते. काल ट्रम्प यांनी होर्मुझची नाकेबंदी जाहीर करत 20 टक्के टोल आकारण्याची घोषणा केली होती. त्यास प्रत्युत्तर देत आज इराणने एमटी अल बहिया आणि एमटी मोम्बासा या दोन तेलवाहू जहाजांवर क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. त्यात अल बहिया या जहाजावरील 12 पैकी एका हिंदुस्थानी खलाशाचा मृत्यू झाला, तर एक खलाशी जखमी झाला. दोन्ही जहाजांवर 46 खलाशी होते. त्यापैकी 30 जण हिंदुस्थानी होते. मोम्बासावरील 18 हिंदुस्थानी खलाशांपैकी 9 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेनंतर हिंदुस्थानने संताप व्यक्त केला असून इराणच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना तत्काळ समन्स बजावण्यात आले.
ट्रम्प टोलला जगभरातून विरोध
डोनाल्ड ट्रम्प यांच्या 20 टक्के टोलचा ब्रिटनसह अनेक देशांनी विरोध केला होता. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ट्रम्प यांनी 20 टक्के टोल म्हणजे सागरी दरोडा असल्याची टीका करत विरोध केला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी आज या निर्णयावरुन माघार घेतली. त्याऐवजी आखाती देशांसोबत व्यापार आणि गुंतवणुकीचे नवे करार करून अमेरिकेत गुंतवणूक केली जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
शेअर बाजार कोसळला
शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 561 अंकांनी कोसळून 77,054 वर तर निफ्टी 159 अंकांनी कोसळून 24,052 अंकांवर बंद झाला. होर्मुझच्या काsंडीमुळे जगावर पुन्हा इंधन पुरवठय़ाचे संकट निर्माण झाले आहे. त्याचा फटका शेअर बाजाराला बसला. या पडझडीमुळे एका दिवसात गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बहरीनमध्ये अमेरिकेच्या तळांवर हल्ले
इराणने बहरिनमधील अमेरिकेच्या अल-जुफैर लष्करी तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला केला. या ठिकाणी शस्त्रसाठा, सॅटेलाईट संचार केंद्र आणि अमेरिकन सैन्याच्या एका इमारतीला लक्ष्य करण्यात आले. इराणने ‘नस्र-2’ असे या मोहिमेला नाव दिले आहे.
तेलाच्या किमती 4 टक्क्यांनी वाढल्या
कच्च्या तेलाच्या किमती आज 4 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 85 डॉलरपर्यंत पोहोचल्या. युद्धबंदीनंतर हे दर 70 डॉलरवर आले होते.
होर्मुझवरील ट्रम्प टोल मागे घेण्याची नामुष्की
होर्मुझवर 20 टक्के टोल लावल्यानंतर तीव्र विरोधामुळे ट्रम्प यांच्यावर 24 तासांत निर्णय मागे घेण्याची नामुष्की ओढावली.






























































