
इगतपुरीच्या भावली धरण परिसरात रविवारी सायंकाळी पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबाच्या कारचा गुंडांनी 20 किलोमीटरपर्यंत पाठलाग करून दहशत माजवली. महिलेचा विनयभंग, जीवघेणा हल्ला आणि दरोडय़ाच्या या घटनेमुळे खळबळ उडाली.
भेदरलेल्या कुटुंबाने अंबड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. घटना इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा तेथे वर्ग करण्यात आला. ग्रामीण पोलिसांनी तातडीने हल्लेखोरांचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाअंती वाडा, भिवंडीसह परिसरातील लॉजमधून नऊ संशयितांना ताब्यात घेतले. इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथील विशाल भटाटे (27), अनिकेत मानवेढे (24), नांदगाव सदोचा अनिरुद्ध भागडे (25), माणिकखांब येथील सागर गीते (22), सचिन आडोळे (29), अर्जुन आडोळे (25), बलाईदुरीचा देवीदास भगत (25), देवळे घोटी येथील अजय दालभगत (20), इगतपुरी गावठा येथील विनोद बोराडे (26) अशी त्यांची नावे आहेत. फरार असलेल्या आकाश भोईर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पर्यटन स्थळांवर भविष्यात अशा घटना घडू नयेत, म्हणून विविध कलमान्वये कडक कारवाई करण्यात येईल. तसेच पर्यटन स्थळांवरील बंदोबस्तात गस्त वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.
नऊ जणांना अटक
ग्रामीण पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून, तिघांचा शोध सुरू आहे. पर्यटन स्थळांवरील बंदोबस्त, नाकाबंदी, गस्त वाढवली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
काय घडले…
नाशिकरोड येथील कुटुंबातील आठ सदस्य रविवारी भावली धरणावर फिरण्यासाठी गेले होते. तेथे दोघांनी या कुटुंबातील महिलेची छेड काढली, जाब विचारणाऱ्या पती व दिराला दुसऱ्या टोळक्याने शिवीगाळ करून मारहाण केली. स्थानिकांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला होता. त्यानंतर हे कुटुंबीय कारने परतत असताना याच गुंडांनी बलेनो कार व दुचाकीवरून पाठलाग केला. वाहनावर दगड तसेच लोखंडी गजाने हल्ले करून काचा फोडल्या.






























































