
फिफा विश्वचषकादरम्यान आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका 25 वर्षीय दक्षिण आफ्रिकन फुटबॉलपटूचे निधन झाले होते. आता 38 वर्षीय रेफ्री रॉब डेप्रिंक यांच्या मृत्यूने क्रीडा विश्व हळहळले आहे. डेप्रिंक यांचा विश्वचषकाच्या व्हिडीओ असिस्टंट रेफ्री संघात समावेश होणार होता. पण स्पर्धा सुरू होण्याच्या एक महिन्यापूर्वी त्यांच्यावर एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला. ज्यामुळे त्यांना वगळण्यात आले, मात्र पुराव्याअभावी हे प्रकरण खोटे असल्याचे समोर आले.
नेदरलँड्स फुटबॉल असोसिएशनने म्हटले आहे की, ‘रॉब यांचा मृत्यू हा एक मोठा धक्का आहे. विश्वचषकात त्यांची व्हिडीओ असिस्टंट रेफ्री म्हणून नियुक्ती होणार होती, पण लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर सर्व बदलले. डेप्रिंक यांच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नाही. रॉब यांच्या निधनाच्या बातमीने आम्हाला धक्का बसला असून आम्ही अत्यंत दुःखी आहोत. रॉब यांच्या रूपाने आम्ही केवळ एक अत्यंत आदरणीय रेफ्रीच नाही, तर एक दयाळू आणि समर्पित सहकारीही गमावला आहे.’
फिफानेही शोक व्यक्त केला
फिफाने लिहिले आहे की, ‘संपूर्ण फुटबॉल समुदायाच्या वतीने आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रांना आमच्या तीव्र शोकसंवेदना व्यक्त करतो.’
लंडन पोलिसांनी अटक केली
रॉब हे 2017 पासून नेदरलँड्समध्ये रेफ्री होते. देशाच्या सर्वोच्च फुटबॉल लीगमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी 2024 मध्ये झालेल्या युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये व्हिडीओ असिस्टंट रेफ्री म्हणून पदभार स्वीकारला. 2026 च्या फिफा विश्वचषकासाठीच्या संघातही त्यांचा समावेश होता. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली लंडन पोलिसांनी त्यांना अटक केली होती.






























































