
या विश्वचषकातील नॉर्वेचा ऐतिहासिक प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आला, पण संघाचा स्टार स्ट्रायकर अर्लिंग हालांद पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी याचे कारण मैदानातील त्याची कामगिरी नसून अमेरिकेतून सोबत आणलेला एक अनोखा ‘सोबती’ आहे. सोमवारी जेव्हा नॉर्वेचा संघ ओस्लोच्या गार्डरमोएन विमानतळावर पोहोचला तेव्हा हालांदला आपल्या हातात एक रॅकून घेऊन जाताना पाहून चाहते आश्चर्यचकित झाले.
सोशल मीडियावर पह्टो शेअर…
विमानतळावरील रेड कार्पेटवरून चालताना हालांद एका हातात 750 डॉलर (अंदाजे 65,000 रुपये) किमतीचा टॅक्सीडर्मी केलेला रॅकून आणि दुसऱ्या हातात त्याची व्हिस्कीच्या बाटलीची प्रतिपृती घेऊन दिसला. सोशल मीडियावर फोटो शेअर करताना त्याने गंमतीने लिहिले, ‘हे माझ्यासोबत घरी आले.’
‘व्हिस्की रॅकून’ म्हणजे काय आहे?
विश्वचषकादरम्यान नॉर्वेचा संघ टेक्सासमध्ये थांबला होता. आपल्या फावल्या वेळेत हालांदने डलासमधील ‘वाईल्ड बिल्स वेस्टर्न स्टोअर’ला भेट दिली. जिथे त्याचे लक्ष दुकानातील टॅक्सीडर्मी केलेल्या (भुसा भरलेल्या) प्राण्यांकडे गेले. तो विशेषतः ‘व्हिस्की रॅकून’ नावाने प्रभावित झाला. हे रॅकून एक सजावटीचे मॉडेल आहे. जे हालांदला आवडले आणि त्याने ते लगेच विकत घेतले.






























































