
चारित्र्याच्या संशयातून झालेल्या छळामुळे तालुक्यातील जांबूत बु. येथे एका 28 वर्षीय विवाहितेने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना उघडकीस येताच, संपूर्ण पठार भागात खळबळ उडाली आहे.
विठाबाई विकास घुले (वय 28) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी माहेरच्यांनी गंभीर आरोप करत पतीसह सासू, चुलत सासरा यांच्याविरुद्ध घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि. 10) विठाबाई शेतात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. मात्र, त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. याबाबत घारगाव पोलिसांत हरवल्याची तक्रारही नोंदविण्यात आली होती. शोधमोहीम सुरू असताना टेकडवाडी परिसरातील मुळा नदीकाठी त्यांची चप्पल, कपडे आढळून आले. त्यानंतर कवठे मळ्याजवळील विहिरीत पाण्यावर तरंगत असलेला त्यांचा मृतदेह रविवारी (दि. 12) आढळून आला.
या घटनेनंतर माहेर आणि सासरच्या नातेवाईकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत महिलेचे वडील सीताराम साबळे (रा. चिंचाळे, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती विकास पहिलवान घुले, नर्मदा पहिलवान घुले आणि हिरामण लक्ष्मण घुले (सर्व रा. जांबूत बु., ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पती विकास यास अटक करण्यात आली असून, सासू नर्मदा व चुलत सासरे हिरामण घुले फरार झाले आहेत. दरम्यान, विठाबाई यांच्यावर सातत्याने चारित्र्याचा संशय घेत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता, असा आरोप फिर्यादित करण्यात आला आहे.






























































