मराठवाड्यातील 32 लाख हेक्टरवरील पिके धोक्यात! शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एल निनो’मुळे मराठवाड्यात उशिरा दाखल झालेल्या पावसानंतर शेतकऱयांनी खरीपाची पेरणी सुरू केली. मराठवाड्याच्या आठ जिह्यांतील एपूण पेरणी क्षेत्रापैकी 32 लाख 6 हजार 967 हेक्टरवर पेरणीची लगबग शेतकऱयांनी केली. मात्र पावसाने काढता पाय घेतल्याने अद्याप 17 लाख 65 हजार 761 हेक्टरवर पेरणीच झाली नाही. पेरणी झालेल्या पिकांना पाण्याचा फटका बसल्याने ही पिके कोमेजू लागत असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीच्या संकटाला समोरे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱया मराठवाड्यात गेल्या वर्षात पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला होता, मात्र ‘एल निनो’च्या प्रादुर्भावामुळे या खरीप हंगामात पावसाचा मोठा फटका शेतकऱयांना बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार राज्यासह मराठवाड्यात पावसाने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावली. खरीप हंगामाला झालेल्या उशिरामुळे शेतकऱयांनी मोठी लगबग करत खरीपाची पेरणी हाती घेतली होती, मात्र पेरणी सुरू असताना जुलैच्या दुसऱया आठवड्यात पावसाने उघड दिली. त्यामुळे मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या आठ जिह्यातील एपूण पेरणी क्षेत्र 49 लाख 72 हजार 728 हेक्टरपैकी 32 लाख 6 हजार 967 हेक्टरवर सोमवार, 13 जुलै अखेर पेरणी केली. उर्वरित 17 लाख 65 हजार 761 हेक्टरवर पेरणी बाकी असतानाच पावसाने विश्रांती घेतल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पिकेही धोक्यात आली आहेत.

पिकांची वाढ खुंटली

पेरणीनंतर काही दिवसांतच पावसाने विश्रांती घेतली आहे. त्याचा मोठा परिणाम पिकांवर होताना दिसत आहे. कपाशी, सोयाबीन, मका या पिकांची वाढ खुंटली असून माळरानावरील पिकांनी माना टाकण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचे मोठे संकट शेतकऱयांसमोर उभे राहिले आहे.