
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खास माणूस असल्याचे सांगत एका रिअल इस्टेट व्यवसाय करणाऱ्याकडून पावणेपाच लाख रुपये लुटल्याचा खळबळजनक प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. या तोतयाने क्राईम ब्रँच अधिकारी असल्याची बतावणीदेखील केल्याचे तपासात उघड झाले असून याप्रकरणी पनवेल पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे.
प्रणव उर्फ संतोष वाळुंजे (४४) असे या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार सत्यवान घरत हे पनवेलमधील करंजाडे भागात राहण्यास असून त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. घरत यांचे आपल्या व्यवसायातील अनेक लोकांकडे लाखो रुपये अडकले आहेत. हीच अडचण ओळखून घरत यांचा मित्र संदीप घनगावे याने त्यांना पैसे काढून देणारे क्राईम ब्रँचचे मोठे अधिकारी त्याच्या ओळखीतील असल्याचे सांगितले. तसेच फडणवीस आणि शिंदेंचे ते खास असल्याचे सांगून अडकलेले पैसे काढून देण्याची बतावणी केली होती.
पोलीस गणवेश, खांद्यावर तीन स्टार संतोष वाळुंजे पोलीस गणवेशात, खांद्यावर तीन स्टार लावून आपले साथीदार महादेव कोंडीलकर आणि नथुराम पवार यांच्यासह घरत यांच्या घरी आला. अडकलेले पैसे वसूल करून देतो असे सांगत २ लाख रुपयांच्या कमिशनची मागणी केली. पैसे दिल्यानंतरही काम होत नसल्याने घरत यांनी याबाबत विचारणा केली. त्यावर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर घरत यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी संतोष वाळुंजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वाळुंजे याला बेड्या ठोकल्या असून फरार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.































































