…तर अयोध्येत आजही आंदोलनाच्या बैठकाच सुरू असत्या, अंबादास दानवे यांनी रामरक्षा पाठांतरावरून मुख्यमंत्र्यांना सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनावर टीका केली आहे. त्यावरून शिवसेना नेते, विधानपरिषदेतील आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत त्यांना चांगलेच सुनावले आहे. ”जर त्यावेळी कारसेवक रामरक्षा पाठ आहे का याची तोंडी परीक्षा घेत बसले असते, तर अयोध्येत आजही आंदोलनाच्या बैठकाच सुरू असत्या”, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. दानवे यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

”कारसेवक रामरक्षा पाठ आहे का याची तोंडी परीक्षा घेत बसले असते, तर अयोध्येत आजही आंदोलनाच्या बैठकाच सुरू असत्या हे मुख्यमंत्री आणि त्यांचे ‘लेफ्ट हँड’ बहुधा विसरलेले दिसतात. विशेष म्हणजे, राम मंदिर आंदोलनाच्या काळात केवळ रेल्वे स्टेशनवरून घरी परतलेल्या काही जणांचा आजचा आवेश पाहिला, तर प्रत्यक्ष कारसेवेत सहभागी झालेल्यांच्या डोळ्यातील तेज फिके पडावे. त्या काळी काही लोक प्रभू रामाच्या कामात वाटा उचलत, आता भलतेच लोक त्यावर तोंडी परीक्षा घेत सुटले आहेत”, असे अंबादास दानवे म्हणाले.

ज्यांना रामरक्षा तोंडपाठ आहे तेच चोर निघाले

दोन पाने रामरक्षा वाचून दाखवणार असाल तर मीदेखील रामरक्षा म्हणायला तुमच्यासोबत येईन, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या आंदोलनावर टीका केली. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, ज्यांना रामरक्षा तोंडपाठ आहे, उत्तम प्रकारे म्हणता येते तेच राम मंदिराच्या दानपेटीचे चोर निघाले. त्यामुळे फडणवीसांनी सल्ले देण्यापेक्षा चोरांवर कारवाई करावी, त्यातले काही चोर महाराष्ट्रातील आहेत, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.