
बिर्याणी खावी तर भेंडीबाजारच्या शालिमारची. चिकन मोगलाई खायचेय तर तिथेच जवळ नूर मोहम्मदीला जावे आणि सीख पराठा, मलाई मालपोवा खायचाय तर डोंगरीच्या रहमानिया शिवाय दुसरी चांगली जागा नाही असे मोठ्या अभिमानाने सांगितले जाते. पण अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या तीनही हॉटेलांचा परवाना निलंबित केला आहे. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेताच तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. एफडीएची कोणत्या क्षणी धाड पडेल याचा नेम नाही अशी दहशतच हॉटेल, रेस्टॉरंट चालकांमध्ये निर्माण झाली आहे. ‘शालिमार हॉस्पिटॅलिटी’, ‘नूर मोहम्मदी हॉटेल’ आणि ‘रहमानिया रेस्टॉरंट’ या तीन मोठ्या हॉटेल्सची नुकतीच एफडीएने अचानक पाहणी केली. या हॉटेलांच्या किचनमध्ये अस्वच्छता आढळली आणि किड्यामुंग्यांचा, झुरळांचा वावर असल्याचे दिसून आले. पिण्याचे पाणी विनामूल्य न देता बाटलीबंद पाणी घेण्याची सक्ती होत होती आणि कच्चा माल व खाद्यतेलांच्या दर्जाची नोंद या हॉटेलांमध्ये आढळली नाही. त्यामुळे एफडीएने या तीनही हॉटेलांचा परवाना निलंबित केला. अमरावतीमधील ‘अमरावती दरबार’ या हॉटेललाही वैध परवान्याशिवाय व्यवसाय करत असल्यामुळे हॉटेल बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
शालीमार रेस्टारन्ट
शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे अन्नपदार्थ विकणाऱ्या हॉटेलांना हे पदार्थ बनवण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे हे अन्नपदार्थ बनवताना वापरली जाणारी भांडी, चॉपिंग बोर्ड आदी वस्तूही वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजेत. वरील तीनही हॉटेलांमध्ये त्या नियमांचे पालन होत नसल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांना आढळले. किचनमधील कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याच्या नोंदी आढळल्या नाहीत. तसेच अनेक कर्मचारी तंबाखू, गुटखा खाऊन किचनमध्ये काम करत होते असेही दिसून आल्याचे एफडीएतील सूत्रांनी सांगितले.



























































